बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘देवाचे हात’ या प्रदर्शनाचे तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते उद्घाटन !
प्रदर्शनात प्राचीन मंदिरे, मूर्ती यांची छायाचित्रे पहाण्याची संधी !
पुणे – महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आणि मूर्ती यांची छायाचित्रे असलेले ‘देवाचे हात’ या प्रदर्शनाचे उद्घाटन तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे झाले. २ ते ४२ हातांपर्यंतच्या मूर्तींची छायाचित्रे असणारे हे प्रदर्शन ३० नोव्हेंबर या दिवशी सकाळी १० ते रात्री ८.३० या वेळेत आयोजित केले असून ते सर्वांसाठी खुले आहे.
या प्रदर्शनात मोरेश्वर कुंटे आणि विजया कुंटे यांनी दुचाकीवर प्रवास करत संकलित केलेले रावण गर्वहरण, गणपति, दशभुजा लक्ष्मी गणेश, सिद्ध लक्ष्मी महागणपति, २१ मुखी ४२ हातांचा गणपति, १० तोंडे २० हातांचा रावण, १२ हातांचा कार्तिकस्वामी, १० हातांचा मारुति आदींची छायाचित्रे पहाता येणार आहेत. विविध ठिकाणच्या मंदिरांतील ८ हातांचा कृष्ण, ७ हातांचा अग्निदेव, ४ हातांचा मारुति, ४ हातांचा विठ्ठल आणि २ हातांच्या गणपतीच्या मूर्तीचे छायाचित्र हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. त्याचसमवेत येथे पुणेकरांना ‘गाणारे दगड’, ‘बोलणारे पाषाण’ आणि पाण्यावर तरंगणार्या विटाही पहायला मिळणार आहेत. या प्रसंगी पंडित विजय घाटे, आयोजक प्रभाकर कुंटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.