सर्वस्वाचा त्याग करणारी आणि नामानिराळे रहाणारी अद्वितीय सनातन संस्था !
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ।।
– भगवद्गीता, अध्याय १२, श्लोक १२
अर्थ : मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे; कारण त्यागाने ताबडतोब परमशांती मिळते.
शिरा खातांना आपल्याला रवा, काजू, बदाम, वेलची, बेदाणे दिसतात; पण ज्यामुळे तो गोड झाला आहे, ती साखर कुठेच दिसत नाही. असे असले, तरी ती साखर शिर्यासाठी आवश्यक आहे. ती सर्वस्वाचा त्याग करते. त्याचप्रमाणे समाजामध्ये निरनिराळी राष्ट्रासाठी कामे चालू असलेली दिसतात; पण त्यामागे असलेली सनातन संस्था दिसत नाही.
१. राष्ट्ररूपी रत्नावर धर्माचे असंख्य पैलू पाडणारी सनातन संस्था !
आपल्या हिंदु संस्कृतीमध्ये रुद्राक्षाला फार महत्त्व आहे; पण रुद्राक्षाचे झाड १२ वर्षांचे झाले, म्हणजे त्यास रुद्राक्ष येतात. त्यानंतर त्याला सात्त्विकता येते. याचप्रमाणे सनातन संस्था ही गेली दोन तपे, म्हणजेच २५ वर्षे सर्व प्रकारच्या आपत्ती झेलून आपल्या ध्येयापासून विचलित न होता राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करत आहे. या राष्ट्ररूपी रत्नावर सनातन संस्था धर्माचे असंख्य पैलू पाडत आहे. त्यामुळे त्यावरून प्रकाशित होणारी असंख्य किरणे आसमंतात उजळून अनेक व्यक्तींचे जीवन प्रकाशित करत आहे आणि प्रकाशित झाली आहेत.
२. सनातन संस्थेने ठेवलेले उच्च ध्येय
सनातन संस्थेने ३ गोष्टींचे स्मरण कायम ठेवले आहे.
अ. ध्येयापेक्षा आपली कामगिरी उच्च असली पाहिजे.
आ. ‘आपल्याकडे काय नाही, यापेक्षा काय आहे’, याचा विचार करा आणि यश खेचून आणा.
इ. जोपर्यंत शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत हार मानू नका.
हे डोळ्यांसमोर ठेवूनच सनातन संस्थेने हिंदु राष्ट्र हे ध्येय समोर ठेवले आहे. नेहमी सिंहाचा छावा मदोन्मत्त हत्तीच्या गंडस्थळावर झेप घेण्याची आकांक्षा बाळगतो. या वेळी एक गोष्ट आठवते. छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्या लढाईनंतर पुरंदरचा तह झाला. तह झाल्यावर दोन्ही राजे चर्चेसाठी एकत्र आले. छत्रपती शिवरायांसह ९ वर्षांचे संभाजी महाराजही होते. तहामध्ये महाराजांना ३६ गड मोगलांना द्यावे लागले. शेवटी एकमेकांना भेटवस्तू देतांना जयसिंग राजांनी २ हत्ती राजांना भेट म्हणून दिले. त्या वेळी जयसिंग राजा सहज चेष्टेच्या सुरात संभाजी महाराजांना म्हणाले, ‘युवराज आम्ही तुम्हाला हत्ती भेट दिले; पण ते तुम्ही रायगडावर कसे नेणार ?’ ९ वर्षांच्या संभाजीराजांनी दिलेले उत्तर हृदयावर कोरून ठेवण्यासारखे आहे. संभाजी महाराज म्हणाले, ‘हत्ती आम्ही कसेही करून गडावर नेऊ; पण तुम्हाला दिलेले गड तुम्ही दिल्लीला कसे नेणार ? ते सांगा. ते गड येथेच रहाणार आहेत ना, ते आम्ही केव्हाही घेऊ शकतो.’
३. साधकांच्या पाठिशी ठामपणे उभी रहाणारी सनातन संस्था !
याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्लंडला जातांना नाशिकमध्ये झालेल्या त्यांच्या निरोप समारंभामध्ये आपल्या भाषणाचा शेवट समर्थांच्या ‘दासबोधा’तील ओवीने केला आहे ते म्हणतात.
बहुत लोक मिळवावे । एक विचारे भरावे ।
कष्ट करूनी घसरावे । म्लेंछावरी ।।
याचप्रमाणे सनातन संस्थेवर निरनिराळी संकटे आली, तरीसुद्धा त्या संकटांना खंबीरपणे संस्थेने तोंड दिले आणि आपल्या साधकांवर आलेल्या आपत्तींच्या वेळी पाठिंबा देऊन त्यांचे मनोबल उंचावून त्यांची सुटका केली.
४. सनातन संस्था प्रत्येक राष्ट्र कार्यात दिशादर्शक
सनातन संस्थेचे राष्ट्र आणि धर्म अशी दोन कार्येच नाहीत. त्यांचे राष्ट्र-धर्म हे एकच कार्य आहे. सनातन प्रत्येक राष्ट्र कार्यात आपणहून भाग घेते आणि समाजाला दिशादर्शक म्हणून उभी रहाते. उदाहरण द्यायचे झाल्यास काश्मिरी पंडितांसाठी प्रारंभीपासून आजपर्यंत त्यांच्या मागे सनातन संस्था ठामपणे उभी आहे. त्याचप्रमाणे लव्ह जिहाद, हलाल (इस्लामनुसार जे वैध ते) अर्थव्यवस्था, गड अतिक्रमण, भूमी जिहाद, मंदिर व्यवस्थापनाचा विषय, ‘गजवा ए हिंद’ (काफीरांना ठार करण्यासाठीचे युद्ध), गोहत्या, शंकराचार्यांना अटक इत्यादी अनेक विषयांवर हिंदूंमध्ये जनजागृती करत असते.
५. सडक (रस्ता), संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांद्वारे हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्नरत सनातन संस्था !
हाती घेतलेले विषय सनातन संस्था मध्येच अर्धवट सोडत नाही, तर ते कितीही वेळ लागला, तरी पूर्णत्वालाच नेते आणि तेसुद्धा सडक (रस्ता), संसद अन् सुप्रीम कोर्ट (सर्वोच्च न्यायालय) या ३ मार्गांचा अवलंब करून ! यातील सडक म्हणजे जनजागृतीसाठी हिंदुस्थानामध्ये निरनिराळ्या विषयांवर दिंड्या (मोर्चे, आंदोलने) काढून जनजागृती केली जात असते. दुसरे संसद, म्हणजे आपले म्हणणे, आपली निवेदने लोकप्रतिनिधींना देऊन त्यांच्या वतीने सरकारवर दबाव आणणे आणि आपली गोष्ट साध्य करून घेणे. तिसरे म्हणजे सर्वाेच्च न्यायालयात स्वतःचे म्हणणे मांडणे. या त्रिशूळाचा उपयोग करून हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करणे.
६. विषयवासना मोडून परोपकार वाढवणारी सनातन संस्थेची ग्रंथसंपदा!
यासह साधकांची आत्मिक शक्ती वाढवण्यासाठी सनातन संस्था ही ग्रंथसंपदेची निर्मिती करते. ते ग्रंथ वाचून आचरण करण्याची सुद्धा प्रवृत्ती वाढत असते, हे महत्त्वाचे कार्य आहे. या ग्रंथांविषयी समर्थांनी ‘दासबोधा’त सांगितले आहे.
जेणें धारिष्ट चढे । जेणें परोपकार घडे ।
जेणें विषयवासना मोडे । त्या नांव ग्रंथ ।।
– दासबोध, दशक ७, समास ९, ओवी ३३
अर्थ : ज्या ग्रंथाच्या श्रवणाने अंगी धारिष्ट्य उत्पन्न होते, हातून परोपकार घडू लागतो आणि विषयवासना नष्ट होते, तोच खरोखर ग्रंथ म्हणावा.
सनातन संस्थेचा एक जरी ग्रंथ वाचला की, याची प्रचिती येते.
७. गुरूंच्या चरणी प्रार्थना !
‘अशी संस्था अनंत काळ या भारतभूमीवर तळपत राहो’, हीच जगत्नियंत्रकाच्या चरणी प्रार्थना ! त्याचप्रमाणे
मी न मागे धनसंपत्ती । मज न लगे वैकुंठप्राप्ती ।
परी तुझ्या भक्तांची संगती । मज घडो सर्वदा ।।
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजविरचित श्रीरामपाठ, ओवी २७
या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या मागणीप्रमाणे मीही म्हणतो, ‘‘सनातन संस्थेच्या साधकांची मला कायम संगती मिळो’, हीच गुरूंच्या चरणी प्रार्थना ।
जय जय रघुवीर समर्थ ।
– श्री. विद्याधर नारगोलकर, अध्यक्ष, पुणे सार्वजनिक सभा. (२५.११.२०२४)