India Appeal To Bangladesh : हिंदूंच्या सुरक्षेचे दायित्व घ्या !

भारताचे बांगलादेश सरकारला आवाहन !

बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस व भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल

नवी देहली – बांगलादेशातील हिंदु आणि अल्पसंख्यांक यांच्या परिस्थितीविषयी आम्ही आमचा विरोध अगदी स्पष्ट केला आहे. हिंदु आणि इतर अल्पसंख्यांक यांना मिळणार्‍या धमक्या आणि लक्ष्यित (टार्गेटेड) आक्रमणे यांविषयी भारताने बांगलादेश सरकारकडे सातत्याने अन् कठोरपणे भूमिका मांडली आहे. अंतरिम सरकारने सर्व अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाचे दायित्व पार पाडले पाहिजे. अतिरेकी वक्तव्यांच्या वाढीमुळे आम्ही चिंतित आहोत. आम्ही बांगलादेशाला अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे आवाहन करतो, अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

चिन्मय प्रभु यांच्या अटकेवर जैस्वाल म्हणाले की, आम्ही इस्कॉनला सामाजिक सेवेची भक्कम नोंद असलेली जागतिक स्तरावरील नामांकित संस्था म्हणून पहातो. जिथपर्यंत चिन्मय प्रभु यांच्या अटकेचा प्रश्‍न आहे, आम्ही त्यावर आमचे निवेदन दिले आहे. व्यक्तींविरुद्ध खटले आणि कायदेशीर प्रक्रिया चालू आहेत. या प्रक्रियांना निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने हाताळले जावे अन् या व्यक्तींचा आणि सर्व संबंधितांचा पूर्ण आदर केला जावा, अशी आमची अपेक्षा आहे.

भारतातून बांगलादेशाला होणार्‍या वस्तूंच्या पुरवठ्याविषयी जैस्वाल म्हणाले की, भारतातून बांगलादेशाला होणार्‍या वस्तूंचा पुरवठा चालूच आहे. त्याचप्रमाणे बांगलादेश आणि भारत यांच्यातील व्यापार दोन्ही दिशांनी चालू आहे.

संपादकीय भूमिका

केवळ आवाहन केल्याने बांगलादेश हिंदूंचे रक्षण करील, अशा भ्रमात रहाता येणार नाही. मुळात तेथील सरकारचेच हिंदूंवर आक्रमण करण्याचे धोरण आहे. ऑगस्टपासून तेथील हिंदूंवर आक्रमणे होत आहेत आणि त्यात कोणतीही घट झालेली नाही. त्यामुळे भारताने कृतीच्या स्तरावर हिंदूंचे रक्षण करण्यासाठी बांगलादेश सरकारला भाग पाडणे आवश्यक आहे. तरच बांगलादेशातील हिंदू ‘सेफ’ (सुरक्षित) रहातील !