Conspiracy Against ISKCON In Bangladesh : ‘इस्‍कॉन’ला आतंकवादी संघटना घोषित करून त्‍यावर बंदी घालण्‍याची मागणी !

बांगलादेशात इस्‍लामी पक्षांचा ‘इस्‍कॉन’च्‍या विरोधात कट

अटक करण्‍यात आलेले ‘इस्‍कॉन’चे सदस्‍य चिन्‍मय कृष्‍ण दास

ढाका – बांगलादेश उच्‍च न्‍यायालयाने अलीकडेच ‘इस्‍कॉन’वर बंदी घालण्‍याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. यानंतर आता बांगलादेशाच्‍या इस्‍लामी पक्षांनीही ‘इस्‍कॉन’ला आतंकवादी संघटना घोषित करून त्‍यावर बंदी घालण्‍याची मागणी केली आहे. जमीयत उलेमा-ए-बांगलादेशचे अब्‍दुल युसूफ यांनी ‘इस्‍कॉन’ला ‘आतंकवादी संघटना’ म्‍हटले आहे. ‘महंमद युनूस सरकारने ‘इस्‍कॉन’वर विलंब न करता बंदी घालावी’, अशी मागणी इस्‍लामी पक्षांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे. त्‍यांनी ‘इस्‍कॉन’चे साधू आणि संत यांचे वर्णन ‘सशस्‍त्र लढवय्‍ये’ असे केले आहे. या पक्षांनी बांगलादेशात कठोर इस्‍लामी कायद्याची मागणी केली आहे.

चिन्‍मय कृष्‍ण दास यांच्‍या आणखी २ साथीदारांना अटक

बांगलादेशातील चितगाव येथे अटक करण्‍यात आलेले ‘इस्‍कॉन’चे सदस्‍य चिन्‍मय कृष्‍ण दास यांच्‍या आणखी २ साथीदार यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही चिन्‍मय कृष्‍ण दास यांना जेवण द्यायला गेले होते.

चिन्‍मय कृष्‍ण दास यांची त्‍वरित सुटका करावी ! – बांगलादेशच्‍या माजी पंतप्रधान शेख हसीना

बांगलादेशच्‍या माजी पंतप्रधान शेख हसीना

बांगलादेशाच्‍या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी चिन्‍मय कृष्‍ण दास यांच्‍या अटकेवरून युनूस सरकारवर टीका केली आहे. चिन्‍मय कृष्‍ण दास यांना झालेली अटक बेकायदेशीर आहे. सनातन धर्माच्‍या एका मोठ्या नेत्‍याला चुकीच्‍या पद्धतीने अटक करण्‍यात आली आहे. त्‍यांची त्‍वरित सुटका झाली पाहिजे, असे शेख हसीना यांनी म्‍हटले आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील इस्‍लामी संघटनांचा हा कट हाणून पाडण्‍यासाठी भारत सरकारने पावले उचलावीत !