इस्रायलने आमच्या सैनिकांना सोडल्यास आम्हीही इस्रायली ओलिसांना सोडू ! – हमास
हमासही युद्धविरामासाठी सिद्ध
तेल अविव (इस्रायल) – हिजबुल्लाप्रमाणे हमासही आता युद्धविरामासाठी सिद्ध झाला आहे. हमासच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, आम्ही इजिप्त, कतार आणि तुर्कीये या देशांच्या मध्यस्थांना कळवले आहे की, आम्ही इस्रायलशी युद्धविराम, तसेच बंदीवानांचे परस्पर प्रत्यार्पण, हे करार करण्यास सिद्ध आहोत.
हमास आणि इस्रायल यांच्यामधील युद्धविरामाच्या अटींविषयी सूत्रांनी सांगितले की, हमास अनुमाने १०० इस्रायली ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात १ सहस्र पॅलेस्टिनी सैनिक अन् हमासचे आतंकवादी यांच्या सुटकेसाठी दबाव आणत आहे. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासने इस्रायलवर आक्रमण करून २५४ इस्रायलींना ओलीस ठेवले होते. यापूर्वी झालेल्या पहिल्या टप्प्यातील चर्चेनंतर १५४ इस्रायली ओलिसांची सुटका करण्यात आली होती.
इस्रायली राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन गवीर यांनी सांगितले की, ओलिसांच्या बदल्यात १ सहस्र आतंकवाद्यांची मुक्तता करण्याच्या मागणीचा समावेश असलेल्या कुठल्याही करारास आम्ही अनुमती देणार नाही. इस्रायली ओलिसांची सुटका करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील; परंतु जे इस्रायली लोकांना मारतात, त्यांची सुटका करणे आम्हाला मान्य नाही.