तुळजाभवानीदेवीच्या मंदिर जीर्णोद्धारास प्रारंभ ! – आमदार राणाजगजितसिंह पाटील
श्री तुळजाभवानीदेवीच्या तीर्थक्षेत्राचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी २ सहस्र कोटी रुपयांचा आराखडा अंतिम !
धाराशिव – कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या तीर्थक्षेत्राचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी २ सहस्र कोटी रुपयांचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे. हा विकास आराखडा उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यात आला आहे. लवकरच त्यास मान्यता मिळेल आणि प्रत्यक्ष कामास प्रारंभ होईल. मंदिर समितीच्या निधीतून ६० कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. यातून श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. पुजारी वर्ग आणि भाविक यांच्या या कामाविषयीच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यासाठी २८ नोव्हेंबर या दिवशी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. पुढील वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले की,
१. पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवी मंदिराच्या सभामंडपाचा काही भाग पूर्ण उकलून पुन्हा नव्याने भक्कम केला जाणार आहे. मंदिरासह आसपासचा भागही मोकळा करून घेतला जाणार आहे. त्यासाठी मंदिरातील ओवर्या थोड्या मागे घेण्यात येणार आहेत.
२. मंदिर आणि परिसरातील कामाचा प्रत्यक्ष आरंभ लवकरच केला जात आहे. यापूर्वीच कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. भाविक, पुजारी बांधव आणि व्यापारी वर्गाला त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.
३. कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि भाविकांच्या सोयी-सुविधांमध्ये यांमुळे मोठी गुणात्मक वाढ होणार आहे.