रोहिंग्यांचा नरसंहार करणार्‍या म्यानमारच्या सैनिकी प्रमुखाला अटक करा !

आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाद्वारे आवाहन

द हेग (नेदरलँड्स) – आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे (इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट, म्हणजेच ‘आयसीसी’चे) मुख्य फिर्यादी करीम खान यांनी म्यानमारचे सैनिकी नेते मिन आंग हलाईंग यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याचे आवाहन केले आहे.

आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे मुख्य फिर्यादी करीम खान

मिन आंग यांच्यावर अल्पसंख्यांक रोहिंग्या मुसलमानांविरुद्ध हिंसाचार आणि छळ अशा गुन्ह्यांचा आरोप आहे. त्यामुळे लाखो रोहिंग्यांना बांगलादेशात पलायन करावे लागले, असे बोलले जाते.

म्यानमारचे सैनिकी नेते मिन आंग हलाईंग

१. खान यांनी रोहिंग्यांविरुद्धच्या हिंसाचाराला ‘वांशिक नरसंहार’ म्हटले असून यांतर्गत सामूहिक हत्या, बलात्कार आणि वस्त्यांचा नाश यांचा समावेश केला आहे.

२. मिन आंग हलाईंग यांनी वर्ष २०२१ मध्ये आंग सान स्यू की यांना पदच्युत करून म्यानमारमध्ये स्वत:ची सत्ता प्रस्थापित केली.

रोहिंग्या मुसलमानांचा इतिहास !

रोहिंग्या मुसलमान हे प्रामुख्याने म्यानमारच्या अराकान प्रांतात रहाणारे आहेत. अराकानच्या मोगल शासकांनी त्यांना तेथे स्थायिक केले होते. वर्ष १७८५ मध्ये बर्मी बौद्धांनी या प्रांतावर नियंत्रण मिळवले. त्यांनी सहस्रो रोहिंग्यांना मारून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर बौद्ध धर्माचे लोक आणि रोहिंग्या मुसलमान यांच्यात हिंसाचार अन् नरसंहार चालू झाला, जो आजही चालू आहे. म्यानमारमध्ये अनुमाने १० लाख रोहिंग्या मुसलमान रहातात; परंतु म्यानमार सरकार या लोकांना म्यानमारचे नागरिक मानत नाही. देशात काही काळापासून भीषण दंगली होत आहेत. यामध्ये रोहिंग्या मुसलमानांवरही आक्रमणे झाली आहेत. यामुळे ते बांगलादेश आणि थायलंड येथील सीमांवर असलेल्या शरणार्थी छावण्यांमध्ये रहात आहेत. सहस्रो रोहिंग्यांनी भारतातही घुसखोरी केली आहे.