बांगलादेशाच्या कारागृहात चिन्मय प्रभु यांना जेवण आणि औषधे नाकारली

अधिवक्त्यांना भेटण्यासही बंदी

इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास प्रभु

ढाका (बांगलादेश) – इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना कारागृहात औषध आणि जेवण पुरवण्याची अनुमती दिली जात नाही. न्यायालयाने चिन्मय प्रभु यांना न्यायालयीन कोठडी सुनावतांना त्यांना सर्व सुविधा पुरवण्याचा आदेश दिला होता. तरीही प्रशासनाकडून सुविधा पुरवण्यास नकार दिला जात आहे. चिन्मय प्रभु यांना त्यांचे सहकारी आणि अधिवक्ते यांनाही भेटू दिले गेले नाही. त्यांच्या भक्तांनी बांगलादेशी अधिकार्‍यांना या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्याची आणि त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी हा प्रश्‍न सोडवण्याची विनंती केली आहे.

भारतातील निवृत्त न्यायाधिशांनी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी

भारतातील उच्च न्यायालयाचे ६८ निवृत्त न्यायाधीश, भारतीय प्रशासकीय अधिकारी, भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आदी वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांनी चिन्मय प्रभु यांच्या सुटकेसाठी भारत सरकारकडे त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या संदर्भातील निवेदन संसद सदस्यांकडे सादर करण्यात आले आहे.

याविषयी जम्मू-काश्मीर पोलिसांचे माजी महासंचालक डॉ. एस्.पी. वैद म्हणाले की, बांगलादेशात हिंदूंसमवेत जे काही होत आहे, ते कधीही मान्य नाही. त्याचा फटका केवळ बांगलादेशालाच नाही, तर भारत आणि इतर देशांवरही पडणार आहे. त्यामुळे आम्ही जवळपास ७५ निवृत्त सरकारी अधिकारी आणि न्यायाधीश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये आम्ही बांगलादेशावर निर्बंध लादण्यासमवेतच कठोर पावले उचलून बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव आणण्याचे आवाहन केले आहे. (मुळात अशी मागणीच करावी लागू नये. सरकारने या दिशेने स्वतःहून पाऊल उचलणे आवश्यक आहे ! – संपादक)

अमेरिकी गायिकेने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेवर व्यक्त केली चिंता !

अमेरिकी गायिका मेरी बिलबेन यांनीही चिन्मय प्रभु यांना तुरुंगात टाकल्याबद्दल आणि बांगलादेशात हिंदु अन् इतर अल्पसंख्यांक यांवर चालू असलेल्या आक्रमणांवर चिंता व्यक्त केली. ‘जागतिक नेत्यांनी याची नोंद घेतली पाहिजेे. आपण जागतिक स्तरावर धार्मिक स्वातंत्र्य आणि सर्व श्रद्धा असलेल्या लोकांच्या सुरक्षेचे रक्षण केले पाहिजे’, असे त्यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंसाठी कायद्याचे राज्य नाही, हे लक्षात घ्या !