नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील ४१ अनधिकृत इमारतींवर प्रशासनाचा हातोडा !
एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारतींचे बांधकाम होईपर्यंत स्थानिक प्रशासन झोपले होते का ? या प्रकरणात दुर्लक्ष करणार्या सरकारी अधिकार्यांवरही प्रशासनाने कारवाई करावी !
मुंबई – पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारती तोडण्याची कारवाई वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाने चालू केली आहे. २८ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून मोठ्या पोलीस पहार्यात प्रशासनाने ही कारवाई चालू केली आहे.
नालासोपारा पूर्व भागातील अग्रवाल नगरी, आचोळे येथे ३० एकर इतका मोठा भूखंड कचराभूमी आणि सांडपाणी यांसाठी आरक्षित आहे. यातील काही भूखंड खासगी होता. वर्ष २००६ मध्ये माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्यांचे पुतणे अरुण गुप्ता यांनी हा भूखंड बळकावला. बनावट बांधकाम अनुमतीपत्र आणि बनावट भोगवटा प्रमाणपत्र सिद्ध करून वर्ष २०१० ते २०१२ या कालावधीत या भूखंडावर अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या. या अनधिकृत इमारतींच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेच्या विरोधात न्यायालयात तक्रार केली होती. त्यावर न्यायालयाने अनधिकृत इमारती पाडण्याचा आदेश दिला होता. सद्यःस्थितीत या इमारतींमध्ये २ सहस्रांहून अधिक कुटुंबे रहात आहेत.
पहिल्या टप्प्यात धोकादायक इमारतींवर कारवाई !या अनधिकृत इमारतींपैकी पहिल्या टप्प्यात ७ धोकादायक इमारती पाडण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या वेळी बेघर झालेल्या नागरिकांनी इमारतीच्या शेजारी आक्रोश केला. पोलिसांनी त्यांना बाजूला केल्यानंतर प्रशासनाने कारवाईला प्रारंभ केला. |