बांगलादेशातील ‘इस्कॉन’चे केंद्र इस्लामी कट्टरतावाद्यांनी बंद पाडले !

हिंदु भक्तांचे सैन्यदलाकडून अपहरण !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील शिबचर येथील ‘इस्कॉन’चे केंद्र इस्लामी कट्टरतावाद्यांनी बलपूर्वक बंद पाडले. यापूर्वी बांगलादेशातील ‘इस्कॉन’चे धार्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्यात आली होती. केंद्र बंद पाडल्यानंतर ‘इस्कॉन’च्या हिंदु भक्तांचे बांगलादेशी सैन्याकडून अपहरण केल्याचे वृत्त आहे. ‘इस्कॉन’ कोलकाताचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी ‘एक्स’वर प्रसारित केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘बांगलादेशातील ‘इस्कॉन’चे केंद्र मुसलमानांनी बलपूर्वक बंद केले. सैन्य आले आणि ‘इस्कॉन’च्या भक्तांना एका वाहनात कोंबून घेऊन गेले !’

दास यांनी एक व्हिडिओही प्रसारित केला, ज्यामध्ये स्थानिक इस्लामी कट्टरतावादी गटाचा एक नेता शिबचर येथील ‘इस्कॉन’चे केंद्र बंद करण्याची मागणी करतांना दिसत आहे. ‘इस्कॉन’ मंदिराचे फलक काही लोक काढून टाकण्यात गुंतलेले असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील ‘इस्कॉन’वरील हे अरिष्ट म्हणजे हिंदु धर्मावरीलच अरिष्ट होय. यासंदर्भात आता जागतिक स्तरावर हिंदूंनी दबावगट बनवून भारत सरकारला बांगलादेशावर दबाव आणण्यास भाग पाडले पाहिजे.