अलंकापुरीत विश्वमाऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा पार पडला !

आळंदी (जिल्हा पुणे) – ‘माऊली माऊली’च्या गजरात, पुष्पवृष्टी, घंटानाद करून २८ नोव्हेंबर या दिवशी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा येथे दुपारी १२ वाजता हरिनाम गजरात पार पडला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात पहाटे ३ वाजता प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांच्या हस्ते माऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक झाला. सकाळी ७ ते ९ वाजता ह.भ.प हैबतबाबा पायरीपुढे हैबतबाबा आरफळकर यांचे कीर्तन झाले. संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन झाले.

कीर्तनात नामदास महाराज यांनी आळंदी तीर्थक्षेत्राचा महिमा, माऊलींचे चरित्र, समाधीचा प्रसंग आदी विषय सांगितले. समाधी सोहळ्याचा प्रसंग सांगतांना ह.भ.प. नामदास महाराज यांच्यासह श्रोत्यांचे डोळे पाणावले. या वेळी माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील, भाजपचे आमदार विजय शिवतारे, खासदार संजय जाधव, प्रमुख विश्वस्त अधिवक्ता राजेंद्र उमाप, तसेच वारकरी भाविक आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. लाखो भाविकांनी महाद्वारातून मुखदर्शन घेतले. समाधी सोहळ्यानिमित्त मंदिरावर विमानातून पुष्पवृष्टी करण्यात आली.