Bangladesh Hindu Arrest : बांगलादेशात आंदोलन करणार्‍या ४७ हिंदूंना अटक !

ढाका – बांगलादेशातील ‘इस्कॉन’चे सदस्य श्री चिन्मय कृष्ण दास प्रभु यांच्या सुटकेसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार्‍या ४७ हिंदूंना ठाकूरगाव जिल्ह्यातील पोलिसांनी अटक केली. या आंदोलकांनी निदर्शनाचे नियम तोडून राज्याविरुद्ध गुन्हा केला, असा दावा पोलिसांनी केला आहे. ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’च्या मानवाधिकार स्वयंसेवकांनी ‘सनातन प्रभात’ला सांगितले की, हिंदु आंदोलनकर्त्यांच्या वतीने कोणताही हिंसाचार झाला नाही; परंतु शांततापूर्ण निदर्शने करणार्‍या हिंदूंवर फौजदारी खटले प्रविष्ट (दाखल) करण्यात आले. हे धार्मिक अल्पसंख्यांकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष पू. रवींद्र घोष यांनी या प्रकरणी पोलीस अधीक्षक आणि उपायुक्त यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली. कोणत्याही कायदेशीर अधिकाराविना अल्पसंख्य हिंदूंच्या विरोधात बनावट खटले सिद्ध करण्याविषयी आणि त्यांना अटक करण्याविषयी मी अतिशय चिंतित आहे, असे घोष यांनी म्हटले आहे.  अल्पसंख्य हिंदू पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने त्यांची सुटका करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकारने बांगलादेशावर दबाव आणावा, अशीच भारतियांची अपेक्षा आहे !