Bangladeshi Hindus Arrest Over Lawyer Killing : बांगलादेशात अधिवक्‍ता सैफुल यांच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणी ३० हिंदूंना अटक

मोठ्या प्रमाणात हिंदूंवर धाडी घालून होत आहे धरपकड

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील चितगाव येथे हिंदूंकडून चिन्‍मय प्रभु यांच्‍या अटकेच्‍या विरोधात शांततेत चालू असलेल्‍या आंदोलनाच्‍या वेळी अधिवक्‍ता सैफुल यांची हत्‍या झाली. या हत्‍येसाठी हिंदूंना उत्तरदायी ठरवत पोलिसांकडून हिंदूंची धरपकड चालू करण्‍यात आली आहे. आतापर्यंत ३० हून अधिक हिंदूंना अटक करण्‍यात आली आहे. यात ६ अधिवक्‍त्‍यांचाही समावेश आहे. त्‍यांच्‍यावर लोकांना तोडफोडीसाठी चिथावणी दिल्‍याचा आरोप आहे. पोलिसांच्‍या धरपकडीमुळे हिंदूंमध्‍ये भीतीचे वातावरण आहे.

चितगावमध्‍ये मुसलमानांकडून सूड घेण्‍याची धमकी

चितगावच्‍या हजारीलेनमध्‍ये रहाणार्‍या एका तरुणाने सांगितले की, येथे मुसलमानांकडून उघड शस्‍त्रे दाखवली जात आहेत. धर्मांध मुसलमानांचा जमाव धार्मिक घोषणा देत सूड घेण्‍याची धमकी देत आहेत.

चितगावमध्‍ये हिंदुबहुल परिसरात रहाणार्‍या एका हिंदूने सांगितले की, २६ नोव्‍हेंबरच्‍या रात्रीपासूनच पोलीस धाड घालत आहेत. पोलिसांसमवेत धर्मांध मुसलमान तरुणही आहेत. हे तरुण लोकांच्‍या घरांवरून खुणा करून ‘कुठे धाड घालायची ?’, हे पोलिसांना सांगत आहेत. शेख हसीना सरकार कोसळल्‍यानंतर या धर्मांधांचे लक्ष्य अवामी लीगचे लोक होते. नव्‍या सरकारने शेख हसीना यांच्‍या अवामी लीगला जवळपास संपवल्‍यानंतर आता हिंदूंना लक्ष्य करण्‍यात येत आहे.

जमात-ए-इस्‍लामी आणि बांगलादेश नॅशनल पार्टी यांच्‍या बैठकांमुळे हिंसाचार वाढण्‍याची शक्‍यता  

जमात-ए-इस्‍लामी आणि माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्‍या बांगलादेश नॅशनल पार्टी यांच्‍या कार्यकर्त्‍यांनी २७ नोव्‍हेंबरला अनेक शहरात बैठका घेतल्‍या. चितगाव प्रकरणानंतर या पक्षांनी प्रत्‍युत्तरात कारवाई करणाची रणनीती आखली आहे. हिंदूबहुल परिसरात आक्रमणे तीव्र करण्‍याचा डाव आखण्‍यात आला आहे. युनूस सरकारवर कठोर कारवाईसाठी या पक्षांनी दबाव आणला आहे. त्‍यामुळे धरपकड वाढून हिंसा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात ऑगस्‍टपासून हिंदूंवर अत्‍याचार होत असतांना भारत सरकारकडून कठोर पावले न उचलणे हिंदूंना अपेक्षित नाही. जगातील सर्व हिंदु ‘एक हैं तो सेफ हैं’ (संघटित राहिलो, तर सुरक्षित राहू) याची प्रचीती बांगलादेशातील हिंदूंना कधी येणार ? असा प्रश्‍न उपस्‍थित होतो !