युरोप तत्त्वनिष्ठ असेल, तर त्याने रशियाशी सर्वच व्यापार संपवावा !
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांचे ‘जी-७’ परिषदेतून रोखठोक प्रतिपादन
रोम (इटली) – युरोपियन युनियन हा भारताचा सर्वांत मोठा व्यावसायिक भागीदार, तसेच गुंतवणूकदारही आहे. आम्ही सातत्याने मोठे करार करत आहोत. दोन्ही लाभदायक करार आर्थिक सहकार्य वाढवू शकतात, असे वक्तव्य भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले. युक्रेन युद्धाच्या वेळी रशियाकडून तेल खरेदीच्या सूत्रावर डॉ. जयशंकर म्हणाले की, प्रत्येक क्षेत्राने अर्थव्यवस्थेच्या वास्तवाचा विचार केला पाहिजे. जर युरोपला त्याच्या तत्त्वांची इतकी काळजी असेल, तर त्याने स्वतःच रशियाशी सर्व व्यापार संपवला पाहिजे. ‘जी-७’ (ग्रुप ऑफ सेव्हेन) देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या २४ ते २६ नोव्हेंबरच्या कालावधीत झालेल्या बैठकीत ‘पाहुणा देश’ म्हणून भारताला निमंत्रित करण्यात आले होते. त्यात सहभागी होण्यासाठी डॉ. जयशंकर इटलीला पोचले आहेत. येथे त्यांनी इटॅलियन वृत्तपत्र ‘कोरिएरे डेला सेरा’शी युक्रेन युद्ध आणि भारत-चीन यांसह अनेक सूत्रांवर संवाद साधला.