पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून १० सहस्र विनाशिरस्त्राण वाहनचालकांवर कारवाई !
पुणे – शिरस्त्राणाविना दुचाकी चालवल्याच्या प्रकरणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुण्यातील १० सहस्र वाहनचालकांवर कारवाई केली. यातून ४४ लाख ५७ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई ‘आर्.टी.ओ.’च्या ‘वायुवेग पथका’ने १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत केली. गेल्या काही दिवसांपासून सरकारी कार्यालयांत दुचाकीवर येणार्यांना शिरस्त्राण अनिवार्य केले आहे. त्याआधी शासकीय कर्मचार्यांना शिरस्त्राणसक्ती करण्यात आली. पुणे ‘आर्.टी.ओ.’च्या वायुवेग पथकाने ऑक्टोबरमध्ये ४ सहस्र १६५ वाहनांची पडताळणी केली. त्यामध्ये २ सहस्र १७५ दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातून सुमारे १० लाख २९ सहस्र रुपयांचा दंड करण्यात आला.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आदेश दिल्यानंतर ‘आर्.टी.ओ.’ प्रशासनाने शिरस्त्राण न घालता दुचाकी सरकारी कार्यालयांत येणार्यांवर कारवाई करण्यास प्रारंभ केला. यासाठी ४ पथके सिद्ध करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद या कार्यालयांचा समावेश करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली. दुसर्या टप्प्यात उर्वरित सर्वच शासकीय कार्यालयांत शिरस्त्राण सक्तीची मोहीम राबवणार, असे त्यांनी सांगितले.