पुणे येथे शारीरिक अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलाची आत्महत्या !
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाला अटक !
पुणे – सतत होणारे अत्याचार आणि अश्लील कृत्य यांमुळे १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर येत आहे. या प्रकरणी संकेत मोहिले या तरुणाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. (मुलांवर सुसंस्कार असणे किती आवश्यक आहे ? हे यावरून सिद्ध होते. भावी पिढी जर अशी होत असेल, तर राष्ट्राचे भवितव्य कसे असेल ? याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक) त्याच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो), तसेच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. मुलाच्या वडिलांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पीडित मुलगा आणि आरोपी संकेतची ओळख होती. एका वर्षापूर्वी संकेतने आमीष दाखवून पीडित मुलाला तळजाई टेकडी परिसरात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याची छायाचित्रे काढून त्याला धमकी दिली होती. हा प्रकार वर्षभर चालू होता.