भगवंताचे झाले, म्हणजे विवेक वैराग्यादी सर्व आपोआप येते !
एक बाई श्रीमहाराजांना म्हणाल्या, ‘विवेक, वैराग्य, अनुसंधान, अनन्य शरणागती आणि चित्ताची एकाग्रता या ५ गोष्टी साध्य झाल्याविना भगवंत भेटणे शक्य नाही, अशी आमची निश्चिती झाली आहे.’ हे ऐकून श्रीमहाराज त्यांना म्हणाले, ‘तुम्ही जे शब्द बोलला, ते मला काही कळलेच नाहीत. एका उपवर मुलीला वाटू लागले की, आपल्याला सासू, सासरा, दीर, जावा, नणंदा असाव्यात. ही नाती तिला परस्पर जोडता येतील का ? नवर्याशी विवाह केला की, ही नाती आपोआप जोडली जातात. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. तसे या पाचही गोष्टी एका भगवंताचे झाले, म्हणजे आपोआप साध्य होतात. त्या साधत नाहीत; म्हणून वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. भगवंताचे होऊन रहाणे आणि त्याची सतत जाणीव ठेवणे, हाच त्याला उपाय आहे. हा इतका सोपा उपाय असतांना मन उद्विग्न करून घेण्याचे काय कारण आहे ?’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)