काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी महायुती म्हणून घेतलेली भूमिका पुष्कळ मोठी ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
भाजपकडून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागत !
नागपूर – काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करून त्यांचे आभार मानले आहेत. विरोधी पक्षांनी एकनाथ शिंदे अप्रसन्न असल्याचा प्रचार केला होता; पण शिंदे यांनी स्वतः पुढे येऊन आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका जनतेपुढे स्पष्ट केली. ‘मुख्यमंत्रीपदाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय घेतील, त्याला पाठिंबा दर्शवला. महायुती म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका पुष्कळ मोठी आहे’, असे बावनकुळे यांनी २७ नोव्हेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.