श्रीमती मनीषा गाडगीळ निवास करत असलेल्या सनातनच्या आश्रमातील निवासस्थानी झालेल्या सात्त्विक पालटांमुळे पू. (सौ.) शैलजा परांजपे यांना आलेल्या अनुभूती
‘जानेवारी २०२१ पासून आम्ही (सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे आणि सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव नारायण परांजपे) दोघे ढवळी, फोंडा, गोवा येथे वास्तव्यास आहोत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळे आम्ही दोघे सनातनच्या आश्रमात सेवेसाठी जातो. मी तेथील खोलीत प्राथमिक संकलनाची सेवा करते. खोलीच्या संदर्भात मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. श्रीमती गाडगीळ करत असलेली ‘भावपूर्ण सेवा आणि त्यांचे ईश्वराशी नित्य अनुसंधान’ यांमुळे खोलीतील सात्त्विक स्पंदने वाढून तेथे सात्त्विक पालट होणे
श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६२ वर्षे) मागील १ वर्षापासून खोलीत वास्तव्य करत आहेत. त्या करत असलेली ‘भावपूर्ण सेवा आणि त्यांचे ईश्वरी अनुसंधान’ यांमुळे खोलीतील सात्त्विक स्पंदने वाढून तेथे सात्त्विक पालट झाले आहेत, उदा. खोलीतील लाद्यांवर पांढर्या रंगाचे गोल, तसेच काही ठिपके उमटणे, खोलीतील भिंतीवरही पांढर्या रंगाचे गोल उमटणे. हे गोल उमटल्याचे श्रीमती मनीषाताईंच्या लक्षात आले.
या खोलीमुळे मलाही माझ्यात पुढील पालट जाणवले.
२. श्रीमती गाडगीळ यांच्या खोलीत गेल्यावर पू. (सौ.) शैलजा परांजपे यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट
२ अ. शारीरिक त्रास न्यून होऊन सेवेत आनंद मिळणे : मी घरून आश्रमात सेवेसाठी येते. तेव्हा कधीतरी मला शारीरिक त्रास होतात. तेव्हा ‘आश्रमात येऊ नये’, असे मला वाटते; परंतु या खोलीत येऊन सेवेला बसल्यावर तेथील चैतन्यामुळे माझे शारीरिक त्रास क्षणांत दूर होतात आणि मला सेवेतील आनंद घेता येतो.
२ आ. दुपारी खोलीत विश्रांती घेतल्यावर लगेचच झोप पूर्ण होणे आणि हा ‘खोलीतील चैतन्याचा परिणाम आहे’, हे लक्षात येणे : घरी अंथरुणावर पडताच मला कधीही लगेच झोप येत नाही. मी या खोलीत दुपारी ३ ते ३.४५ वाजेपर्यंत विश्रांती घेते. विश्रांतीसाठी मी श्रीमती मनीषा गाडगीळ वापरत असलेल्या पलंगावर झोपते. तेव्हा तेथील चैतन्यामुळे मला लगेचच झोप येते आणि ‘थोड्या कालावधीत माझी झोप पूर्ण होऊन मी जागी होते. हासुद्धा ‘येथील चैतन्याचा परिणाम आहे’, असे मला वाटते.
२ ई. ‘श्रीमती मनीषाताई यांच्याकडून ‘सतत होणारा नामजप आणि त्यांचे सत्चे विचार’ यांमुळे या खोलीत देवाचे अस्तित्व सतत टिकून रहाते’, हे माझ्या लक्षात आले.
‘हे सगळे आम्हाला कळावे’; म्हणून देव असे चांगले पालट घडवून आणतो आणि त्याच्या अस्तित्वाची आम्हाला अनुभूती देतो.
‘हे गुरुदेवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले), ‘तुम्ही खोलीत झालेल्या पालटांविषयी अनुभूती दिली आणि ‘श्रीमती मनीषाताई यांच्या अनुसंधानामुळे निर्जीव खोलीही कशी सजीव झाली आहे’, हे आम्हाला दाखवून दिले’, याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– (पू.) सौ. शैलजा परांजपे, ढवळी, फोंडा, गोवा. (२२.१०.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |