सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेमुळे चालू झालेल्या भक्तीसत्संगांनी ‘मागील आठ वर्षांमध्ये साधकांना काय काय दिले’, याचे कृतज्ञतापूर्वक अवलोकन !
साप्ताहिक भक्तीसत्संगाच्या ‘अष्टवर्षपूर्ती’ निमित्ताने
‘भाववृद्धी सत्संग’ या नावाने आरंभ झालेल्या सत्संगाचा प्रथम दिवस होता, ५.१०.२०१६ ! या वर्षी नवरात्रीमध्ये आश्विन शुक्ल चतुर्थीला, म्हणजे ७.१०.२०२४ या दिवशी सत्संगांच्या या शृंखलेला ८ वर्षे पूर्ण झाली, म्हणजेच या भक्तीसत्संगांची ‘अष्टवर्षपूर्ती’ झाली. गेल्या आठ वर्षांपासून प्रतिसप्ताह असलेल्या या भक्तीसत्संगांनी साधकांना भरभरून ज्ञान आणि भक्ती यांची भेट दिली. ‘या आठ वर्षांमधील सत्संग शृंखलेने साधकांना काय काय दिले ?’, याचे कृतज्ञतापूर्वक अवलोकन केले असता अनेक सूत्रे लक्षात आली. ती सूत्रे लेखरूपात श्री गुरूंच्या चरणी समर्पित करत आहे.
२१ नोव्हेंबर या दिवशी या लेखातील काही सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया. (भाग २)
४. भक्तीसत्संगांमुळे गुरुकृपायोगाच्या अंतर्गत असलेली ‘अष्टांग साधना’ होण्यास साहाय्य होणे
साधना करतांना गुरुकृपेवाचून सर्वकाही व्यर्थ आहे. ‘गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे आणि जीव शिवाशी जोडला जाणे’, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात. ‘गुरुकृपायोगा’चे वैशिष्ट्य म्हणजे ‘ज्ञानयोग’, ‘कर्मयोग’, ‘ध्यानयोग’ आणि ‘भक्तीयोग’ अशा सर्व साधनामार्गांना सामावून घेणारा हा सहजसुलभ असा ईश्वरप्राप्तीचा मार्ग आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सर्वयोग समावेशक आणि सर्व योगांचा सुंदर संगम असलेल्या या ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती केली आहे.
गुरुकृपायोगानुसार करावयाच्या साधनेचा एक सिद्धांत आहे, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ ! पृथ्वीवरील लोकसंख्या सातशे कोटींहून अधिक आहे. त्यामुळे ईश्वरप्राप्ती करण्याचे सातशे कोटींहून अधिक मार्ग आहेत. पृथ्वीवरील कोणतीही दोन माणसे एकसारखी नसतात. प्रत्येकाची प्रकृती आणि पात्रता वेगवेगळी असल्याने ईश्वरप्राप्तीचे मार्गही अनेक आहेत. स्वतःची प्रकृती आणि पात्रता यांना अनुरूप अशी साधना केल्यास ईश्वरप्राप्ती जलद गतीने होण्यास साहाय्य होते. सनातन संस्थेचे सहस्रो साधक ‘गुरुकृपायोगा’च्या एकाच छत्राखाली आपापल्या प्रकृतीनुसार निरनिराळी साधना करत आहेत.
४ अ. गुरुकृपायोगानुसार साधनेचे टप्पे : यात प्रामुख्याने आठ प्रकाराने साधना सांगितली असून त्यांना ‘अष्टांग साधना’ असे म्हणतात. श्री गुरूंच्या कार्याचा एक भाग असलेल्या या दिव्य भक्तीसत्संगांनी अष्टांग साधनेतील आठही सूत्रांना स्पर्श केला आहे. अष्टांग साधनेतील आठही सूत्रांना भक्तीमय स्पर्श देऊन आपल्या साधनेला दिशा दिली आहे. याविषयी आता आपण भक्तीमय अवलोकन करूया.
४ अ १. स्वभावदोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन ! : अष्टांग साधनेतील प्रथम सूत्र म्हणजे ‘स्वभावदोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन !’ भावाचा अभाव, म्हणजेच स्वभाव ! या ‘स्वभावा’तील ‘स्व’ काढून टाकल्यावर शेष रहातो, तो म्हणजे ‘भाव’ ! स्वभावदोषांमुळे साधकांची पुष्कळ हानी होते. गुरुदेवांनी भक्तीसत्संगांच्या माध्यमातून साधकांना प्रत्येक प्रयत्नाला भावाची जोड द्यायला शिकवले. ‘विविध स्वभावदोषांवर भावाच्या स्तरावर मात कशी करायची ? स्वभावदोष निर्मूलनासाठी भगवंताचे साहाय्य कसे घ्यायचे ?’, हे शिकवले. त्यामुळे स्वभावदोषांचे निर्मूलन करण्यातही साधकांना आनंद मिळू लागला.
यासमवेतच भक्तीसत्संगांनी भाववृद्धीच्या प्रयत्नांद्वारे स्वभावदोषांचे परिवर्तन गुणांमध्ये करण्याची दिव्य दिशा दिली. त्यामुळे साधकांमधील गुणरूपी धनाची वृद्धी होऊन तिचा व्यष्टी-समष्टीमध्ये लाभ होऊ लागला आहे. ती सद्गुणरूपी पुष्पे श्री गुरुचरणी समर्पित होऊ लागली. अशा प्रकारे भक्तीसत्संगांद्वारे ‘स्वभावदोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन’ हा टप्पा सहजतेने साध्य होऊ लागला आहे.
४ अ २. अहंनिर्मूलन : अष्टांग साधनेतील दुसरा टप्पा म्हणजे ‘अहंनिर्मूलन !’ ईश्वराशी एकरूप होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अहंनिर्मूलन ! ‘अहं’ हा साधना आणि भक्ती यांतील मोठा अडथळा असतो. व्यक्तीमध्ये अहंचा थोडा जरी अंश असला, तर तिला ईश्वरप्राप्ती होणार नाही. यासाठी साधना करत असतांना अहं-निर्मूलनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असते. अहं जितका जास्त, तितकी व्यक्ती जास्त दुःखी होते. ईश्वर म्हणजे शून्य अहं; म्हणून आपल्यातील अहं नष्ट करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ईश्वरासारखे होण्याचा, म्हणजेच ईश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे. यासाठी भाववृद्धीचे प्रयत्न हे एक उत्तम माध्यम आहे.
ईश्वराचे परम सामर्थ्य आपल्या मनावर बिंबवून त्यापुढे ‘स्वतःचे अस्तित्व आणि कर्तेपणा किती न्यून आहे’, हे भक्तीसत्संगांनी साधकांच्या मनावर बिंबवले आहे. त्यामुळे साधकांना अहंनिर्मूलनाच्या प्रयत्नांसाठी दिशा मिळाली. या भक्तीसत्संगांनी अहं, मीपणा आणि कर्तेपणा यांचा त्याग करायला लावून कर्तेपणाचे रूपांतर शरणागती अन् कृतज्ञता यांमध्ये करायला शिकवले. त्यामुळे ‘मी’च्या ऐवजी भगवंताला अनुभवणे साधकांसाठी सुलभ होऊन त्यांना खरा आनंद मिळू लागला. अशा प्रकारे भक्तीसत्संगांद्वारे अष्टांग साधनेतील दुसरा टप्पा असलेल्या ‘अहंनिर्मूलना’साठीही दिशा मिळू लागली आहे.
४ अ ३. नामजप : अष्टांग साधनेतील तिसरा टप्पा म्हणजे ‘नामजप’ ! मन आणि चित्त यांच्या शुद्धीसाठी नामजप हा एक अत्यंत सोपा उपाय आहे. आपल्या सर्वांचे भाग्य थोर आहे की, आपल्याला गुरुदेवांनी नामजपाची शिकवण दिली. नामजपामुळे मनातील विचारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. गुरुदेवांनी आपल्याला नामाची गोडी लावल्यामुळे आपण नामजप करू लागलो. नामजपाच्या माध्यमातून गुरुऊर्जा प्राप्त होऊन त्या बळावर आपल्याला प्रत्येक प्रसंग, तसेच परिस्थिती यांना सामोरे जाता येऊ लागले. आपल्या सर्वांना ‘नामा’च्या माध्यमातून या अनुभूती घेता येतात. ही आपल्यावरील गुरुकृपाच नव्हे का ? नामाद्वारे ईश्वराशी अनुसंधान साधण्यासाठी भक्तीसत्संगांतून विविध प्रकारे दिशा मिळत आहे. ‘आपण करत असलेला नामजप भगवंताच्या चरणी पोचण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ? त्याद्वारे साक्षात् भगवंताचे अस्तित्व कसे अनुभवायचे ? नामानुसंधानाद्वारे आनंद कसा अनुभवायचा ?’, हे सर्व भक्तीसत्संगांतील विविध भावार्चनांच्या माध्यमातून आपण अनुभवले आहे. अशा प्रकारे अष्टांग साधनेतील ‘नामजप’ हा तिसरा टप्पाही साध्य करण्यासाठी भक्तीसत्संगांतून दिशा मिळत आहे.
४ अ ४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न : अष्टांग साधनेतील चौथा टप्पा म्हणजे ‘भावजागृतीसाठी प्रयत्न’ ! दैनंदिन जीवनातील प्रत्येक लहान लहान कृतीपासून ते जीवनातील सर्व कठीण प्रसंगांमध्येही ‘कृतीला भावाची जोड कशी द्यायची ?’, हे भगवंताने या सत्संगांच्या माध्यमातून शिकवले. श्री गुरूंनी आपल्याला व्यक्तीगत, कौटुंबिक, सामाजिक, तसेच आश्रम आणि साधना अन् सेवा या सर्व स्तरांवर विविध प्रकारे भावाचे पैलू शिकवले. ‘भाव’ हाच या सत्संगांचा पाया आहे. साधकांमध्ये भाववृद्धी करून आता साधकांना भक्तीच्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी भगवंत सत्संगाच्या माध्यमातून अविरतपणे दिशा देत आहे. अशा प्रकारे भक्तीसत्संगाच्या माध्यमातून ‘भावजागृती, भाववृद्धी आणि आता भक्ती’, असा प्रवास श्री गुरुकृपेनेच घडत आहे.
४ अ ५. सत्संग : अष्टांग साधनेतील पाचवा टप्पा म्हणजे ‘सत्संग’ ! सत्संग म्हणजे सत्चा संग, म्हणजेच ईश्वराचा संग ! या भक्तीसत्संगांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष ईश्वराचा संग अनुभवायला मिळतो. हा केवळ श्रवण करण्याचा सत्संग नसून साधकांना आध्यात्मिक आणि भक्तीची ऊर्जा देऊन प्रत्यक्ष प्रयत्नांसाठी कृतीप्रवण करणारा सत्संग आहे. सत्संगात सांगितलेले प्रयत्न केवळ ऐकून न घेता ते लिहून घेणे, त्यानुसार सप्ताहभर प्रयत्न करणे, एवढेच नव्हे, तर केलेल्या प्रयत्नांचा आढावाही आत्मनिवेदनाद्वारे कथन करण्याची संधी साधकांना मिळत असते. या भक्तीसत्संगांतील भक्तीऊर्जाच त्यांच्याकडून भक्ती वाढण्यासाठी प्रयत्न करून घेते. त्यामुळे ‘भक्तीसत्संग’ म्हणजे श्री गुरूंनी निर्मिलेल्या विविध आदर्श सत्संगांमधील एका सत्संगाचे उदाहरण आहे. प्रतीसप्ताह मिळणार्या या भक्तीसत्संगामुळे साधक संपूर्ण सप्ताहभर ईश्वराचा संग अनुभवत आहेत. त्यामुळे ‘सत्संग’ हा टप्पाही साधक खर्या अर्थाने अनुभवू लागले आहेत.
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२६.९.२०२४) (क्रमशः)