विश्वदेवांकडे ‘पसायदान (कृपा) मागणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि ‘अवघे जगत् आनंदी व्हावे’, यासाठी विश्वकल्याणकारी कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा ‘संजीवन समाधीदिन’ आहे. त्या निमित्ताने…
‘भगवान श्रीकृष्णाने ‘सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश आणि धर्मसंस्थापना’ यांसाठी अवतार घेतला. त्याने मानवाच्या कल्याणासाठी ‘श्रीमद्भगवद्गीता’ सांगून सर्वांना जीवनाचा मार्ग दाखवला. याच भगवद्गीतेच्या एकूण १८ अध्यायांमधील ७०० श्लोकांवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथातून ९ सहस्र ओव्यांचे भाष्य केले. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी संपूर्ण समाजाला भक्तीचे वळण लावले आणि समाजामधील सत्प्रवृत्तींचे पोषण केले. त्यांनी विश्वकल्याणासाठी विश्वदेवांकडे ‘पसायदाना’च्या माध्यमातून प्रार्थना केली. पसायदान हे ज्ञानेश्वरीच्या विवेचनाला आलेले अमृतफळ आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याप्रमाणे सांप्रत काळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगितला. ते अनेक ग्रंथांची निर्मिती करत आहेत आणि ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी विश्वकल्याणकारी कार्यही करत आहेत.
पसायदानातील काही ओव्यांतून माझ्या अल्पमतीला जाणवलेले ‘संत ज्ञानेश्वर महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य’ यांविषयीचे विवेचनरूपी कृतज्ञतापुष्प श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.
१. भगवंताकडील मागणे
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९४
अर्थ : आता विश्वरूपी देवाने या वाग्यज्ञाने (ज्ञानेश्वरीच्या लिखाणाने) संतुष्ट व्हावे आणि संतुष्ट होऊन मला पुढील प्रसाददान द्यावे.
१ अ. संत ज्ञानेश्वर : यांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या रूपाने ९ सहस्र ओव्यांचा वाग्यज्ञ (भाष्ययज्ञ) केला. त्यानंतर विश्वात्मक देवाने संत ज्ञानेश्वरांवर प्रसन्न होऊन ‘त्यांना पसायदान (प्रसाद) मिळेल’, असा आशीर्वाद दिला.
१ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘साधकांनी गुरुकृपायोगानुसार साधना करून मोक्षाला जावे आणि धर्मजागृती होऊन हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, यांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्वरेच्छा म्हणून विश्वकल्याणकारी कार्य करत आहेत.
२. समाजातील दुष्ट प्रवृत्ती नष्ट होऊन जीवमात्रांचे परस्परांवरील प्रेम वाढावे !
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९५
अर्थ : खलांचा (दुष्टांचा) कुटीलपणा नाहीसा व्हावा. खलांची सत्कर्मांच्या ठिकाणी आवड वाढावी आणि प्राण्यांची परस्परांशी जिवाभावाची मैत्री व्हावी !
२ अ. संपूर्ण समाजाला भक्तीचे वळण लावणारे संत ज्ञानेश्वर ! : संत ज्ञानेश्वर यांनी संपूर्ण समाजाला भक्तीचे वळण लावले आणि समाजामधील सत्प्रवृत्तींचे पोषण केले. ज्या दुष्ट लोकांनी त्यांचा छळ केला, त्या खलपुरुषांसाठीही त्यांनी पसायदान मािगतले. त्यासाठीच आपण त्यांना ‘माऊली’ म्हणून गौरवतो. येथे ते ‘दुष्टांचा नाश व्हावा’, असे न म्हणता ‘त्यांचा दुष्टपणा नष्ट व्हावा’, असे सांगतात; कारण व्यक्तीतील दुष्टपणा नष्ट झाल्यावर त्या व्यक्तीचा देवत्वाकडे जाण्याचा मार्ग सुकर होतो. अशा व्यक्तीची सत्कर्माकडे असलेली आवड वाढते. असे झाले, तर जगातील सर्व जीवमात्रांचे परस्परांवरील प्रेमही वाढते.
२ आ. समाजातील दुष्प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी अध्यात्मप्रसार आणि राष्ट्र-धर्म जागृतीचे कार्य अविरतपणे करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर ! : सांप्रतकाळी भ्रष्टाचार, अनैतिकता, आतंकवाद, अधर्म, राष्ट्रद्रोह इत्यादींनी परिसीमा गाठली आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे समस्त मानवजातीला अध्यात्म आणि साधना यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी जगभरात अध्यात्मप्रसार करून धर्मजागृती करत आहेत. साधकांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ केल्याने साधकांतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होऊन त्यांच्यात ईश्वरी गुणांचे संवर्धन होत आहे अन् ते मोक्षाच्या मार्गावर वाटचाल करत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे राष्ट्र आणि हिंदु धर्म यांची जागृती अन् त्यांचे रक्षण करण्याचे अवतारी कार्य अविरत चालू आहे. त्यामुळे ईश्वरी कृपेने हिंदु राष्ट्राची पहाट लवकरच होऊ शकेल !
३. साधना करणार्या मनुष्याच्या सर्व इच्छा ईश्वरच पूर्ण करील !
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९६
अर्थ : पापाचा अंधार जावा आणि विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा. प्राणिमात्रांत जो जे इच्छील, ते ते त्याला प्राप्त व्हावे.
३ अ. संत ज्ञानेश्वर यांनी ‘मनुष्य धर्मानुसार वागल्यास ईश्वरच त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करील’, असे सांगणे : विश्वातील लोकांना सूर्यरूपी स्वधर्माचे ज्ञान होऊन त्यांच्या पापाचा अंधार जावो. प्रत्येक जण धर्मानुसार वागल्यास त्याच्याकडून पापकर्म होणार नाही. पापकर्म करणे, हे मनुष्याचे स्वाभाविक किंवा नियत कर्म नाही. प्रत्येक धर्माचरणी माणसाची वृत्ती विशाल झाली की, ते एकमेकांना हवे ते देतील. ईश्वरच सर्वांची इच्छा पूर्ण करील.
३ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ‘ईश्वराची प्राप्ती झाल्यास मनुष्याला सर्वकाही मिळेल’, असे आश्वस्त करणे : मनुष्यजन्म मिळण्याचा मुख्य उद्देश ‘मनुष्याचे जन्मोजन्मींचे प्रारब्ध संपून त्याने ईश्वरप्राप्ती करावी’, हा आहे. प्रत्येक गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत रहाण्यापेक्षा ज्या ईश्वराने सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत, त्या ईश्वराची प्राप्ती केल्याने मनुष्याला सर्वकाही मिळेल. साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांना ईश्वरप्राप्ती व्हावी, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगितला. त्यानुसार साधना करून सहस्रो साधक ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
(क्रमश: उद्याच्या दैनिकात)
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.१२.२०२३)