Delhi HC On Sanatan Dharma Raksha Board : ‘सनातन धर्म संरक्षण मंडळा’च्‍या स्‍थापनेची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्‍यास देहली उच्‍च न्‍यायालयाचा नकार

याचिकाकर्त्‍यांना सरकारकडे जाण्‍याचा सल्ला !

नवी देहली – ‘सनातन धर्म संरक्षण मंडळा’च्‍या (सनातन धर्म रक्षण बोर्डाची) स्‍थापना करावी, या मागणीसाठी करण्‍यात आलेलल्‍या यचिकेवर सुनावणी करण्‍यात देहली उच्‍च न्‍यायालयाने नकार दिला.

मुख्‍य न्‍यायाधीश मनमोहन सिंह यांच्‍या अध्‍यक्षतेखालील खंडपिठाने या याचिकेवर सुनावणी केली. न्‍यायालयाने म्‍हटले की, असे मंडळ स्‍थापन करण्‍याचे निर्देश न्‍यायालय अधिकार्‍यांना देऊ शकत नाही. हे सूत्र धोरणात्‍मक क्षेत्रात येत असल्‍याने न्‍यायालयाऐवजी सरकारशी संपर्क साधावा. हे सूत्र संसदेत खासदार उपस्‍थित करतील. या मागणीविषयी आम्‍ही काहीही करू शकत नाही. आम्‍ही ‘ट्रस्‍ट बनवा’ असे म्‍हणू शकत नाही.

केंद्र सरकारकडून प्रतिसाद नाही ! – सनातन हिंदू सेवा संघ ट्रस्‍ट

याचिकाकर्ते ‘सनातन हिंदू सेवा संघ ट्रस्‍ट’च्‍या अधिवक्‍त्‍यांनी युक्‍तीवाद केला की, सनातन धर्माचे रक्षण करण्‍यासाठी मंडळाची आवश्‍यकता आहे. इतर धर्मांसाठीही अशाच प्रकारची मंडळे आहेत; परंतु आमच्‍या मागणीवर केंद्राकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.