इंधन चोरीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम !
आरोपीला जामीन नाकारतांना मुंबई उच्च न्यायालयाची टिपणी
मुंबई – पेट्रोलियम आधारित इंधन चोरीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो, असे निरीक्षण नोंदवत न्हावा शेवा बंदरातील इंडियन ऑईल टँकिंग लिमिटेडच्या पाईपलाईनमधून पेट्रोल चोरल्याचा आरोप असलेल्या एकाला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.
अशा चोरींमुळे इंधनाच्या किमतीत वाढ होते. विविध करांतून मिळणारे उत्पन्न न्यून होते आणि बेकायदेशीर व्यापार वाढतो. याचिकाकर्ता या प्रकरणातील मूळ सूत्रधार असून बेकायदेशीर केल्या जाणार्या इंधनाच्या व्यापाराचे जाळे उघड करण्यासाठी त्याची कोठडी आवश्यक आहे, असे न्यायमूर्ती आर्.एन्. लढ्ढा यांच्या एकलपिठाने अहमद खान याची अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी फेटाळतांना नमूद केले.
पोलिसांनी १४.९० लाख रुपये किमतीचे १३ सहस्र लिटर पेट्रोल चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी खानने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.