संपादकीय : हिंदुहिताच्या राजकारणाची नांदी !
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या तुलनेत ४.९५ टक्के इतकी वाढ झाली. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ३८ मुसलमानबहुल मतदारसंघांतील बहुतांश ठिकाणी मुसलमानांची एकगठ्ठा मते महाविकास आघाडीला मिळाली. एम्.आय्.एम्., वंचित बहुजन आघाडी आदी पक्ष असूनही त्यांना मतदान करण्याऐवजी महायुतीच्या उमेदवारांना हरवू शकेल, अशा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याची हुशारी मुसलमानांनी दाखवली. मुंबईतील मुसलमानबहुल मतदारसंघांमध्ये मुसलमानांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मतदान केल्याचा आश्चर्यकारक प्रकार हा त्याचाच परिणाम होता. या धर्तीवर नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही याची पुनरावृत्ती होईल, याचे अनुमान महाविकास आघाडीने बांधले होते. त्यामुळे या निवडणुकीत वाढलेले मतदान ‘ही मुसलमानांची एकगठ्ठा मते आहेत कि हिंदूंची एकी आहे ?’, याविषयी तर्क बांधले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून आले, तर युतीचे केवळ १७ खासदार निवडून आले होते. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांना मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांची अपेक्षा होती. मुसलमानांनी महाविकास आघाडीला मतदान केलेही; मात्र या निवडणुकीत हिंदूंच्या मतांची टक्केवारी वाढली. त्यामुळे महाविकास आघाडीला धोबीपछाड देणे महायुतीला शक्य झाले. हिंदूंच्या मतांची टक्केवारी वाढली नसती, तर महायुतीची गत लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे झाली असती, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे महायुतीचे बहुमत हा हिंदूंच्या वाढीव मतांचा परिणाम होय, हे आता सुस्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रचार सभेत योगी आदित्यनाथ यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’ ही घोषणा दिली, त्या वेळी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘या घोषणेची महाराष्ट्रात आवश्यकता नाही’, असे बोटचेपी भूमिका घेतली; मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेचे जोरदार समर्थन केले. हिंदुत्वाचे हे ठामपणे केलेले समर्थन हिंदूंना भावले. महाराष्ट्रात मनसेकडून तब्बल १२८ ठिकाणी उमेदवार उभे करण्यात आले होते. दुसरीकडे शरद पवार यांच्यासारख्या मुसलमानधार्जिण्या नेत्यांच्या छायेत सिद्ध झालेल्या अजित पवार यांना महायुतीमध्ये घेण्याला हिंदूंकडून काय प्रतिसाद मिळेल ? याविषयीची ठोकताळे बांधले जात होते; मात्र यांमुळे महायुतीच्या मतांचे विभाजन होणार नाही, याचाही समंजसपणा हिंदूंनी विधानसभा निवडणुकीत दाखवून दिला. हिंदुत्वाविषयी हिंदू सजग आणि जागरूक होत असल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे येणार्या काळात राजकारणाचा पाया ‘हिंदुत्व’ हाच ठेवणे, हे महायुतीसाठी आणि हिंदूंसाठीही हिताचे आहे.