२६ नोव्हेंबर २००८ या दिवशीच्या आतंकवादी आक्रमणातील हुतात्म्यांना राज्यपालांकडून अभिवादन !
मुंबई – येथे २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणात पोलीस अधिकारी आणि सैनिक यांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. पोलीस दलाच्या वतीने आयोजित १६ व्या हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त या आक्रमणात वीरमरण आलेल्या शहीद जवानांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मुंबई पोलीस मुख्यालयातील हुतात्मा स्मारक येथे जाऊन पुष्पचक्र वाहिले.
या वेळी पोलीस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’, तसेच ‘बिगुलर्स लास्ट पोस्ट’ वाजवले. उपस्थित मान्यवरांनी, तसेच गणवेशधारी पोलीस अधिकारी आणि जवान यांनी हुतात्म्यांना सलामी देत अभिवादन केले. त्यानंतर राज्यपालांनी हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची, तसेच उपस्थित आजी-माजी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची भेट घेतली.
पुन्हा कधीही मुंबई आणि देशात २६/११ सारखी घटना होऊ देणार नाही ! – देवेंद्र फडणवीस
यापुढे पुन्हा कधीही मुंबई आणि देशात २६/११ सारखी घटना होऊ देणार नाही. भविष्यातही आम्ही आमच्या पोलिसांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी ते म्हणाले, ‘‘त्या वेळी झालेले आतंकवादी आक्रमण पोलिसांनी परतवून लावले. भारत हा एक मजबूत आणि सक्षम देश आहे. वर्ष २०१४ नंतर भारतात कुणीही बाँबस्फोट करण्याची हिंमतही करू शकले नाही, असे सामर्थ्य भारताने उभे केले आहे. जोपर्यंत आपल्या मनात ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना निर्माण होणार नाही, आपण देशासाठी जगण्याचा विचार करणार नाही आणि कुटुंब अन् समाज यांच्यापेक्षा देश महत्त्वाचा आहे, ही भावना निर्माण होणार नाही, तोपर्यंत जगातील सर्वांत मजबूत राष्ट्र म्हणून आपली संकल्पना पूर्ण होऊ शकणार नाही.’’