शारीरिक शक्ती वाढवा !
निरोगी जीवनासाठी व्यायाम – ३०
आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गोनॉमिक्स’ (ergonomics) चे तत्त्व, आणि आजारानुसार योग्य व्यायाम यांची माहिती सादर करणार आहोत. व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल.
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/856952.html
१. शरीरशक्ती कमावणे काळानुरूप आवश्यक !
‘दिवसेंदिवस प्रत्येकाने स्वावलंबी बनले पाहिजे’, असा काळ येत आहे. प्रत्येकाला स्वसामर्थ्यावरच विश्वास ठेवावा लागेल, अन्यथा निरामय जीवन जगणे कठीण होईल. स्वाभिमानपूर्वक आयुष्य घालवावयाचे असेल, तर शरीरशक्ती कमावली पाहिजे.
२. निरोगी मनुष्यच प्रगती साधू शकणे
निरोगी मनुष्य नेहमीच निर्भय असतो. त्याला भविष्याची चिंता फारशी नसते; कारण निरोगी शरीर आणि मन असल्यामुळे त्याच्या मनात सतत अनेक कल्पनांचा उदय होतो अन् असा आशावादी माणूस स्वतःची प्रगती साधू शकतो.
३. व्यायाम करून बलसंपन्न अन् निरोगी बनणे आवश्यक
रोगी, दुर्बल माणसाचे ज्ञानतंतू साधारणपणे दुर्बल, मंद असतात. अशी माणसे कुटुंब किंवा समाज यांच्या काय उपयोगी पडणार ? असले रोगी आणि दुर्बल जीवन जगण्यात त्यालाही आनंद कुठून मिळणार ? आयुष्यात निरोगी आणि सामर्थ्यसंपन्न शरीरचलाचा आनंद अनुभवायचा असेल, तर व्यायाम करून बलसंपन्न अन् निरोगी बनले पाहिजे. ज्याच्या योगे माणसाच्या नसानसांतून अलौकिक चेतनाशक्तीचा पूर वाहील. अशी म्हण आहे, ‘आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे.’
४. यशस्वी होण्यासाठी ‘निरोगी शरीर’ हेच मुख्य भांडवल !
वस्तूस्थिति अशी आहे की, प्रत्येक मनुष्य आपल्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कोणत्या ना कोणत्या तरी उद्योगांत अतिशय श्रम करत असतो. ‘आयुष्य आहे तोपर्यंत काम हे चालणारच’, यांत मुळीच शंका नाही. कामाच्या या सततच्या बोजामधून काही वेळ काढून शरीर निरोगी आणि बलवान राहील, एवढ्यासाठी त्यात आवश्यक तो व्यायाम केला पाहिजे, म्हणजे आरोग्य आपोआप मिळेल; कारण या सांप्रत जीवनात यशस्वी होण्यासाठी निरोगी शरीर हेच मुख्य भांडवल आहे ! तसेच डॉक्टर वैद्यांच्या कडू मिश्रणांचा आणि काढ्यांचा आस्वाद घेण्याचा कठीण प्रसंग येणार नाही.
५. व्यायाम ही एक संजीवनी !
‘व्यायाम करणार्या मनुष्याला एकदा त्याची आवड उत्पन्न झाली, म्हणजे तो त्यापासून क्वचितच परावृत्त होतो’, असा अनुभव आहे. व्यायाम ही एक संजीवनी आहे. या संजीवनीचे ज्यांनी सेवन केले आहे, त्यांनी आयुष्यभर निरोगी स्थिति मिळवली आहे.
६. व्यायामामध्ये रोग मूळांतून नाहीसे करण्याचे सामर्थ्य असणे
प्रत्येक मनुष्याला पैलवान बनायचे नसते; पण आरोग्य मिळविण्यापुरता आपल्या वेळातील थोडा वेळ काढून व्यायाम केला पाहिजे. जिथे डॉक्टर वैद्यांच्या औषधांनी गुण येत नाही, तिथे व्यायामाने थोडक्या अवधीतच पुष्कळ लाभ झाला आहे आणि हो, व्यायामामध्ये रोग मुळांतून नाहीसे करण्याचे सामर्थ्य आहे, हा मुख्य लाभ !
७. स्वतःच्या संरक्षणापुरते तरी सामर्थ्यवान होणे आवश्यक !
प्रत्येक माणसाने अधिक नसले, तरी स्वतःच्या संरक्षणापुरते तरी शरीरसामर्थ्य कमावले पाहिजे. आजचे युग शक्ती, बल कमावण्याचे आहे. व्यायाम करून शरीर आणि मन यांची शक्ती कमावणे, हेच प्रत्येकाचे प्रथम व्यावहारिक कर्तव्य आहे; कारण त्यातून पुढील सर्व कर्तव्ये पार पाडण्याची प्रेरणा अन् बळ मिळते.’
(साभार : मासिक ‘व्यायाम’, शं. धों. विद्वांस, संपादक, १५.२.१९५७)
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise