न्‍यायपालिका हा विरोधी पक्ष नसल्‍याने मला राहुल गांधींशी वाद घालायचा नाही ! – निवृत्त सरन्‍यायाधीश चंद्रचूड

निवृत्त सरन्‍यायाधीश चंद्रचूड

नवी देहली – ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्‍थेच्‍या संपादिका स्‍मिता प्रकाश यांनी निवृत्त सरन्‍यायाधीश डी.वाय. चंद्रचुड यांची मुलाखत घेतली. त्‍या वेळी स्‍मिता प्रकाश यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, ‘आता विरोधी पक्षांनाही न्‍यायव्‍यवस्‍थेचे काम करावे लागत आहे’, या वक्‍तव्‍याविषयी त्‍यांचे मत विचारले असता न्‍यायमूर्ती चंद्रचुड म्‍हणाले की, न्‍यायपालिका ही कायद्यांचा आढावा घेण्‍यासाठी असते आणि लोकशाहीत राजकीय विरोधकांना वेगळे स्‍थान असते. न्‍यायपालिका हा विरोधी पक्ष नाही. त्‍यामुळे मला राहुल गांधींशी वाद घालायचा नाही. ‘मला सध्‍या न्‍यायालयीन कामांपासून दूर रहायचे आहे. मला शिकवायचे आहे, मला तरुणांशी संपर्क साधायचा आहे’, असेही ते म्‍हणाले.

राहुल गांधी यांनी अलीकडेच म्‍हटले होते की, आम्‍ही प्रसारमाध्‍यमे, अन्‍वेषण संस्‍था आणि न्‍यायपालिका यांच्‍या वतीने एकट्याने काम करत आहोत. हे भारताचे वास्‍तव आहे. माजी सरन्‍यायाधीश चंद्रचूड यांना हा प्रश्‍न विचारण्‍यात आला तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘न्‍यायव्‍यवस्‍थेने विधीमंडळात विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे असा अनेकदा गैरसमज असतो, जो खरा नाही. आम्‍ही येथे कायदे तपासण्‍यासाठी आहोत.’’

न्‍यायपालिकेच्‍या खांद्यांवरून इतरांवर लक्ष्य साधण्‍याचा प्रयत्न ! – माजी सरन्‍यायाधीश

कार्यकारी मंडळाची कारवाई कायद्याच्‍या अनुषंगाने आहे कि नाही आणि ती राज्‍यघटनेशी सुसंगत आहे कि नाही, हे पडताळण्‍याचे दायित्‍व न्‍यायपालिकेवर सोपवण्‍यात आले आहे. काही लोक न्‍यायपालिकेच्‍या खांद्यांवरून इतरांवर लक्ष्य साधण्‍याचा प्रयत्न करतात आणि न्‍यायालयाला राजकीय विरोधाचे ठिकाण बनवण्‍याचा प्रयत्न करतात, असेही माजी सरन्‍यायाधीश म्‍हणाले.