जय जय महाराष्ट्र माझा…!
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर
वर्ष २०१५ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा महाराष्ट्रात जातीयवादालाच प्रमुख ‘स्ट्रॅटेजी’ (धोरण) ठरवून राजकारण करण्याचा प्रयोग चालू झाला होता. वर्ष २०१९ च्या निवडणुकीत जनतेने दिलेला स्पष्ट कौल नाकारून भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून महाविकास आघाडी हे कुठलीही वैचारिक सुसूत्रता नसलेले एक कृत्रिम कडबोळे निर्माण करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या अडीच वर्षांच्या कारभारात त्यांनी जनतेला त्यांच्याविषयी प्रेम आणि विश्वास वाटेल, असे काहीही केले नाही. ‘केवळ स्वतःच्या अहंकारापायी मुंबई मेट्रो आणि इतर अनेक प्रकल्प रखडवणे, त्यामुळे होणारी सोय अन् विकास यांपासून सर्वसामान्य जनतेला वंचित ठेवणे; अभिनेत्री कंगना राणावत, संपादक अर्णब गोस्वामी, अभिनेत्री केतकी चितळे यांसारख्या अनेक प्रकरणात स्वतःच्या खुनशी वृत्तीपायी सर्व लोकशाही संकेत आणि नियम धाब्यावर बसवून मनमानी करणे; सचिन वाझेसारख्या कलंकित अधिकार्यांना हाताशी धरून हप्तावसुली, वर्दीतील गुंडगिरी यांचे थैमान घालणे; ‘कोविड’ महामारीचे संकट आलेले असतांनाही शासकीय यंत्रणेवर पकड ठेवून कामाला चालना देण्याऐवजी घरी बसून रहाणे’, या गोष्टींमुळे शासनाचे काम थांबल्याचा अनुभव महाराष्ट्राने घेतला.
१. ‘महाविकास आघाडी’च्या काळात उभे करण्यात आलेले ‘नॅरेटिव्ह’ (कथानक)
लोकशाहीच्या तत्त्वांना धाब्यावर बसवून ही आघाडी बनली आणि सत्तेत आली. याचा आनंद झाला तो केवळ मोदी, संघ आणि भाजप यांच्याविषयी मनात टोकाचा द्वेष बाळगणार्या एका विशिष्ट वर्गाला ! यात जिहादी, समाजवादी, शहरी नक्षली, तथाकथित ‘लिबरल्स’ (उदारमतवादी), मराठी मिडिया या बोलभांड गटांचा समावेश होता. यांना चांगली जमणारी एकमेव गोष्ट, म्हणजे स्वतःला हवा तो ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) उभा करणे. या कौशल्याचा पुरेपूर वापर करून त्यांनी ‘महाविकास आघाडी’ची (‘मविआ’ची) एक आभासी प्रतिमा निर्माण केली. जिथे शरद पवार हे योद्धे, चाणक्य वगैरे; तर उद्धव ठाकरे हे संयमी असे सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री होते. ‘मुंबई मेट्रो रखडवण्याचा प्रकार पर्यावरणाच्या कळकळी पायी केला होता’, या ‘नॅरेटिव्ह’मुळे मविआ ही एक लोकप्रिय आघाडी आहे’, असा बेगडी समज निर्माण करण्यात आला. यासह ‘शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष फुटल्यामुळे त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली आहे’, असाही ‘नॅरेटिव्ह’ निर्माण करण्यात आला. खरे तर सहानुभूती भाजपला मिळायला हवी होती; कारण धोका त्यांना दिला गेला होता. पण या ‘नॅरेटिव्ह’च्या लढाईत भाजप अल्प पडला.
२. भाजपविरोधी ‘नॅरेटिव्ह’ लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत अधिकच प्रभावी आणि भाजपची झालेली चूक
त्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या वेळी अमेरिकन ‘डीप स्टेट’ आणि चीन यांनी ‘मोदींना निवडणुकीत काहीही करून हरवायचे’, यासाठी सहस्रो कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली. जिचा वापर मोदी किंवा भाजप विरोधी ‘नॅरेटिव्ह’साठीच करण्यात आला. याचा परिणाम महाराष्ट्रातही होऊन आधीच निर्माण केला गेलेला भाजपविरोधी ‘नॅरेटिव्ह’ अधिकच प्रभावी ठरला आणि लोकसभा निवडणुकीत ‘मविआ’ला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले. यात अर्थातच मुसलमानांच्या एकगठ्ठा मतदानाचा मोठा वाटा होता. याखेरीज ‘४०० पार’चा (लोकसभेत ४०० जागा जिंकणे) नारा देऊन भाजपने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. ‘यांना ४०० हून अधिक जागा पाहिजेत; कारण यांना आरक्षण रहित करण्यासाठी राज्यघटना पालटायची आहे’, असा तद्दन खोटा प्रचार करणे शक्य झाले. यामुळे भाजप समर्थकांमध्ये अतीआत्मविश्वास निर्माण होऊन त्यांनी प्रचाराकडे लक्ष दिले नाही आणि मतदानाला येणेही जरूरी मानले नाही. दुसर्या बाजूला ‘इंडी’ आघाडीचा (भाजपविरोधी पक्षांचा) अपप्रचार आणि मुसलमानांचे मतदान मात्र १०० टक्के झाले. त्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ‘आम्हाला संघाची (रा.स्व.संघ याची) आवश्यकता नाही’, हे मूर्खपणाचे विधान केले आणि संघानेही प्रचारात झोकून दिले नाही.
३. महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपने केलेले प्रयत्न
‘नॅरेटिव्ह’च्या लढाईतील या विजयामुळे काहीही सकारात्मक काम न केलेली ‘मविआ’ ही ‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत नक्कीच मोठा विजय मिळवणार’, असे सगळ्यांनाच वाटू लागले; पण यानंतर भाजपने अवघ्या दोन-अडीच मासांत चित्र कसे पालटले, हे यापुढे व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांना ‘केस स्टडी’ (एखाद्या विशिष्ट प्रकरणाचा तपशीलवार सखोल अभ्यास) म्हणून शिकवण्यात येईल !
अ. चूक सुधारण्यासाठी आधी नक्की काय चुकले, हे समजून घ्यावे लागते. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्ही ‘नॅरेटिव्ह’ची लढाई हरलो’, हे सर्वप्रथम मान्य केले. त्यानंतर ‘नॅरेटिव्ह’ची लढाई भाजपने योजनाबद्ध पद्धतीने जिंकली.
आ. यामध्ये सिंहाचा वाटा उचलणार्या संघाने ‘व्होट (मतदानाच्या माध्यमातून) जिहाद’ असाच अनिर्बंधपणे चालू राहिला, तर भारताची अखंडता आणि हिंदु धर्माचे अस्तित्व यांच्यासाठी पुष्कळ मोठा धोका उत्पन्न होईल’, हे हिंदूंपर्यंत पोचवले. यासह मतदारांना मोठ्या संख्येने मतदानाला येण्यास प्रेरित केले.
इ. ‘लाडकी बहीण’ योजनेचा मोठा परिणाम होऊन मोठ्या उत्साहाने महिला मतदानाला आल्या.
ई. अशा प्रकारे वाढलेला मतदानाचा टक्का भाजपसाठी पुष्कळ लाभदायी ठरला; कारण ‘व्होट जिहाद’चे ‘कन्सॉलिडेशन’ (एकत्रीकरण) लोकसभा निवडणुकीच्या वेळीच झाले होते. त्यात वाढ होण्याची शक्यता नव्हती. वाढीव टक्का हा भाजपचाच होता आणि त्यांनीच ‘मविआ’ला भुईसपाट केले.
४. निवडणुकीच्या निकालावरून समोर आलेली तथ्ये
अ. हा निकाल आश्चर्यकारक नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जनतेत राहून, प्रत्यक्ष कार्यस्तरावर काम करणारे नेते बाहेर पडल्यानंतर ‘मविआ’ची क्षमता, गुणवत्ता अन् पात्रता, त्यांना ज्या किरकोळ जागा मिळाल्या तितकीच होती. बाकी होता तो ‘नॅरेटिव्ह’चा फुगा. तो फुटल्यानंतर योग्य तो निकाल लागला.
आ. मुसलमानांच्या मतांच्या लालसेपोटी ‘मविआ’ ही जिहादी तत्त्वांच्या कुठल्याही मागण्या मान्य करू शकते, हे लक्षात घेऊन संघाने प्रचारात पूर्णपणे झोकून दिले. देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी संघ किती प्रभावीपणे काम करू शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
इ. सगळ्यात आनंदाचे आणि अभिमानाचे, म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने जातीयवाद प्रक्षोभक करण्याच्या विषारी योजना उधळून लावल्या. हे वातावरण टिकवण्यासाठी जातीयवादाला थारा देणारा एक शब्दही न उच्चारण्याची काळजी आता प्रत्येकानेच घ्यायला हवी.
असे असले, तरी ‘भारत तोडो’ टोळी शांत बसणार नाही, हे नक्की. त्यांचे देशाबाहेरील ‘हँडलर्स’ (चालक) समाजात फूट पाडून अराजक माजवण्याचा उद्योग पुन्हा नव्या दमाने चालू करतील. त्यामुळे ‘सजग रहो’, हा मंत्र विसरून चालणार नाही ! महाराष्ट्राचे अभिनंदन आणि त्रिवार जयजयकार !
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (२५.११.२०२४)