श्रीमती मनीषा गाडगीळ निवास करत असलेल्या आश्रमातील खोलीत झालेेले पालट !

‘सनातनच्या पहिल्या संत प.पू. (श्रीमती) विमल फडकेआजी यांच्या कन्या श्रीमती मनीषा गाडगीळ गोवा येथील आश्रमाच्या निवासस्थानी मागील ३ वर्षांपासून रहात आहेत. त्या रहात असलेल्या खोलीतील लादी आणि भिंत यांवर पांढर्‍या रंगाचे गोल ठिपके उमटले आहेत. याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

प.पू. (श्रीमती) विमल फडकेआजी

१. देवद, पनवेल येथील सनातन संकुलातील घरी ‘प.पू. (श्रीमती) विमल फडकेआजी यांच्या खोलीत काही पालट झाले आहेत का ?’, असे साधिकेने मुलाला विचारणे 

‘२८.८.२०२४ या दिवशी सेवा करतांना माझ्या मनात विचार आला, ‘प.पू. (श्रीमती) विमल फडकेआजी यांची खोली देवद, पनवेल येथील सनातन संकुलात आहे. मी माझा मुलगा श्री. निनाद गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३७ वर्षे) याला भ्रमणभाष करून विचारले, ‘‘प.पू. फडकेआजी यांच्या खोलीत काही पालट झाले आहेत का ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘मला काही पालट लक्षात आले, तर तुला सांगतो.’’

२. ‘खोलीतील पालट’ असे शब्द मनात आल्यावर तो ‘देवाचा विचार आहे’, असे जाणवणे 

३०.८.२०२४ या दिवशी पुन्हा माझ्या मनात ‘खोलीतील पालट’, हेे शब्द येऊ लागले. त्या वेळी तो ‘देवाचा विचार आहे’, असे मला जाणवले.

श्रीमती मनीषा गाडगीळ

३. साधिका निवास करत असलेल्या खोलीत त्याच दिवशी जाणवलेले पालट

३ अ. लादीवर पांढर्‍या रंगाचे गोल उमटणे : त्याच रात्री (३०.८.२०२४) ८ वाजता अकस्मात् माझे लक्ष मी रहात असलेल्या खोलीतील माझ्या पलंगाभोवती असलेल्या लादीवर गेले. तेथे मला पांढर्‍या रंगाचे मोठ्या आकारातील अनेक गोल (ठिपके) दिसले. माझा पलंग काटकोनात असलेल्या २ भिंतींना अगदी लागून आहे. त्यांपैकी एका भिंतीजवळ माझे डोके झोपतांना असते. पलंगाची लांबी असलेल्या भागाच्या पुढील लादीवर पलंगापासून अडीच फुटांच्या अंतरापर्यंत मला दिसलेले पांढर्‍या रंगाचे गोल होते. तसेच पलंगाची रूंदी असलेल्या (झोपतांना माझे पाय येतात त्या) भागाच्या पुढील लादीवर पलंगापासून १ फूट अंतरापर्यंतही मला दिसलेले पांढर्‍या रंगाचे गोल होते. अशा प्रकारे माझ्या पलंगाभोवती त्या २ ठिकाणी मला पांढर्‍या रंगाचे गोल दिसले.

३ आ. लादीवर उमटलेल्या गोलांकडे पहातांना आनंद जाणवणे : नंतर नीट पाहिल्यावर मला लादीवर पांढर्‍या रंगाच्या गोलांप्रमाणे काही पांढर्‍या रंगाच्या आयताकृतीही दिसल्या. पांढरे गोल साधारण दीड ते २ सेंटीमीटर व्यासाचे, काही १ सेंटीमीटर व्यासाचे, तर काही लहान ठिपक्यांप्रमाणे आहेत. लादीवर उमटलेल्या त्या गोलांकडे पहातांना मला आनंद जाणवत होता.

३ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कृपेमुळेच लादीवर उमटलेले गोल लक्षात येणे : फिकट पिवळसर रंगाच्या लादीवर खरेतर पांढरे गोल दिसणे कठीण आहे; पण लादीवर उमटलेले हे गोल केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कृपेमुळेच माझ्या लक्षात आले. त्या गोलांकडे पाहून मला चांगली स्पंदने जाणवली आणि माझे मन कृतज्ञतेने भरून आले.

४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना पांढर्‍या गोलांविषयी विचारल्यावर त्यांनी ‘हे गोल सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांशी असलेल्या साधिकेच्या अनुसंधानामुळे उमटले आहेत’, असे सांगणे 

मी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारले, ‘‘माझी आई प.पू. विमल फडके यांच्या खोलीतील लादीवर अशाच प्रकारचे पांढर्‍या रंगाचे गोल उमटले होते. त्यांचा आणि या खोलीत उमटलेल्या पांढर्‍या गोलांचा काही संबंध आहे का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘नाही. हे तुमच्या सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांशी असलेल्या अनुसंधानामुळे उमटले आहेत.’’

५. सकाळी उठून लादीवर पाय ठेवल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या निवासाच्या खोलीतील आकाशी निळी लादी दिसणे आणि प्रार्थना केल्यावर ती लादी अन् गुरुदेवांचे चरण यांचा स्पर्श अनुभवता येणे 

जुलै २०२४ पासून सकाळी झोपेतून उठल्यावर पलंगावरून खाली लादीवर पाय ठेवल्यावर मला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या निवासाच्या खोलीतील आकाशी निळी लादी दिसते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर पलंगावरून खाली त्यांचे चरण ठेवतात, त्या लादीचा स्पर्श मी एकदा अनुभवला होता. त्याप्रमाणे सकाळी उठल्यावर मी ‘ती लादी आणि गुरुदेवांचे चरण यांचा स्पर्श मला अनुभवता येऊ दे अन् सेवा आणि साधना करण्यासाठी त्यातून मला बळ मिळू दे’, अशी प्रार्थना करते.

५ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या खोलीतील लादीचा कापसासारखा मऊ आणि चैतन्यमय स्पर्श अनुभवल्यावर मन शांत होणे : प्रार्थना केल्यावर त्या लादीचा कापसाइतका मऊ आणि चैतन्यमय स्पर्श अनुभवल्यावर माझे मन शांत अन् स्थिर होते. सकाळी उठल्यावर मला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणकमलांचा स्पर्श झालेल्या चैतन्यमय लादीची आठवण होते, ही केवळ त्यांचीच कृपा आहे. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

६. निवासाच्या खोलीत काळ्या मुंग्या येणे 

६ अ. लादीवर पांढरे गोल उमटलेल्या भागात काळ्या मुंग्या येणे आणि याविषयी सद्गुरु डॉ. गाडगीळ यांना सांगितल्यावर त्यांनी ‘आता खोलीत चांगले पालट होत रहाणार’, असे सांगणे : १०.९.२०२४ या दिवशी मी निवास करत असलेल्या खोलीतील लादीवर ज्या ठिकाणी पांढरे गोल उमटले होते, तेवढ्याच भागात काळ्या मुंग्या आल्या. त्या मुंग्यांकडे पाहून मला चांगले वाटत होते. ‘काळ्या मुंग्या चांगल्या असतात’, हे मी अनुभवले होते. १२.९.२०२४ या दिवशी मी याविषयी सद्गुरु गाडगीळकाकांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘हो. आता खोलीत चांगले पालट होतच रहाणार !’’

६ आ. वर्ष २००६ मध्ये प.पू. फडकेआजी रहात असलेल्या घरात पुष्कळ काळ्या मुंग्या येणे आणि नंतर चार दिवसांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर घरी येणे : ८.७.२००६ या दिवशी माझी आई प.पू. फडकेआजी रहात असलेल्या घरात पुष्कळ काळ्या मुंग्या आल्या होत्या. त्यानंतर लगेच चार दिवसांनी १२.७.२००६ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर प.पू. फडकेआजींना भेटायला घरी आले. तेव्हा घरात काळ्या मुंग्या येण्याचा अर्थ मला समजला.

६ इ. निवास करत असलेल्या खोलीत काळ्या मुंग्या येणे आणि नंतर चार दिवसांनी एका संतांचा सत्संग लाभणे : त्यानंतर १०.९.२०२४ या दिवशी खोलीत काळ्या मुंग्या आल्यानंतर लगेच चार दिवसांनी, म्हणजे १४.९.२०२४ या दिवशी मला एका संतांचा  सत्संग लाभला. तेव्हा मला मागील प्रसंगाची आठवण झाली.’

७. संतांप्रती कृतज्ञता वाटणे 

सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी प्रतिदिन या माझ्या खोलीत सेवा करण्यासाठी येतात. त्यांचे चैतन्य खोलीत सेवा करणार्‍या सर्व साधिकांना मिळते. ‘संतांच्या कृपेमुळे खोलीत पालट होतात आणि तेथील चैतन्य टिकून रहाण्यास साहाय्य होते’, असे मला जाणवते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर, ‘आपली कृपा आणि संत सहवास’ यांमुळेच हे सर्व अनुभवता येत आहे’, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते !’

– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६२ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.९.२०२४)   ॐ

२.९.२०२४ या दिवशी लादीवर उमटलेले पांढर्‍या रंगाचे गोल पाहिल्यावर त्यांची सूक्ष्मातील जाणवलेली वैशिष्ट्ये   

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. ‘मला लादीवर उमटलेल्या पांढर्‍या गोलांकडे पाहून पुष्कळ चांगले वाटले.

२. पांढर्‍या रंगाच्या गोलांचे परीक्षण करतांना जाणवलेली सूत्रे : पांढरे गोल उमटलेल्या लादीवर उभे राहून परीक्षण केल्यावर ‘ईश्‍वराकडून चैतन्याचा पुष्कळ स्रोत सहस्रारावर येत आहे’, असे मला जाणवले. माझ्या संपूर्ण देहात चैतन्य पसरले, तसेच मला थंडावा आणि हलकेपणा जाणवला.’

– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२५.९.२०२४)

सद्गुरु गाडगीळकाका परीक्षण करत असतांना त्यांच्या जागी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे 

सद्गुरु गाडगीळकाका लादीवर उमटलेल्या पांढर्‍या गोलांचे परीक्षण करत असतांना त्यांच्याकडे पाहून माझे हात आपोआप जोडले गेले. तेव्हा मला त्यांच्या जागी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवले आणि माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. हे मी सद्गुरु गाडगीळकाकांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरच परीक्षण करत आहेत’, असाच भाव मी ठेवतो. ‘ते कसे परीक्षण करतील ?’, असा मी विचार करतो. त्यामुळे मला परीक्षणात वेगवेगळे पैलू आपोआपच लक्षात येतात.’’ तेव्हा ‘मला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे अस्तित्व का जाणवले ?’, याचे कारण समजले.’

– श्रीमती मनीषा गाडगीळ

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक