‘स्वयंसूचना’ हे मनाच्या आजारावरील औषध असल्याच्या संदर्भात साधिकेला जाणवलेली सूत्रे !

‘एका प्रसंगात मला माझ्यातील ‘मला कळते’, हा अहंचा पैलू सूक्ष्म स्तरावर कार्यरत असल्याचे लक्षात आले. तेव्हा ‘त्यावर लगेचच तात्कालिक स्वयंसूचना घेऊया’, असे मला वाटले. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कु. रजनीगंधा कुर्‍हे

१. स्वयंसूचना द्यायला आरंभ करणे

अ. मी स्वयंसूचना द्यायला आरंभ केल्यावर मला जांभया आल्या. नंतर माझे मन संपूर्ण एकाग्र होऊन मला सूचना ग्रहण करता येऊ लागली.

आ. मी याच स्वयंसूचना घेणे चालू ठेवल्यानंतर माझ्या मनाला पुष्कळ शांत वाटले. ‘या स्वयंसूचना आणखी एक घंटा घ्याव्यात’, असे मला वाटले. नंतर अर्ध्या घंट्याने माझ्या मनाला हलके वाटून आनंद जाणवला.

इ. ‘माझ्या चित्तामध्ये दडलेला अहंचा संस्कार बाहेर पडत आहे आणि स्वयंसूचनेचे चैतन्य आतमध्ये जात आहे’, असे मला जाणवले.

२. स्वयंसूचनेमधील मुख्य दृष्टीकोन मनाने ग्रहण करणे 

मी स्वयंसूचनेमधील मुख्य दृष्टीकोन दहा ते बारा वेळा मनातल्या मनात म्हणत होते. तेव्हा ‘मन स्वयंसूचनेतील अती आवश्यक भागाकडे संपूर्ण केंद्रित झाले आहे’, असे मला जाणवले.

त्या वेळी ‘स्वयंसूचना, म्हणजे मनाला दिलेले एक औषध आहे’, असे वाटून ‘मन त्याच्या आजाराला जेथे जेथे आवश्यक वाटत होते, तेथे ते औषध पुरवत आहे अन् सूचनेच्या माध्यमातून स्वतःला बरे करत आहे’, असे मला जाणवले.’

– कु. रजनीगंधा कुर्‍हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक