‘संभलमधील (उत्तरप्रदेश) जामा मशीद हे हरिहर मंदिर होते’, याविषयी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अहवालात लपले आहे सत्य !

संभल (उत्तरप्रदेश) येथील जामा मशीद हे मंदिर असल्याचा दावा हिंदूंकडून करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर संभल येथील या मशिदीचे सर्वेक्षणही करण्यात आले असून त्यानंतर त्या भागात पुन्हा एकदा जातीय राजकारण तापले आणि यावरून दंगलही चालू आहे. ‘जामा मशीद हे प्राचीन हरिहर मंदिर होते, जेथे श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी एक असलेल्या कल्कीचा कलियुगात अवतार होणार आहे’, असा दावा हिंदूंनी केला आहे; मात्र मुसलमान पक्षाने हा दावा पूर्णपणे फेटाळला आहे.

संभल येथील जामा मशीद

१. जामा मशिदीचा इतिहास

संभल जिल्ह्यात उभी असलेली जामा मशीद ही हिंदूंचे मंदिर असल्याचा दावा यापूर्वी अनेकदा करण्यात आला. ‘मोगल सम्राट बाबरने मंदिर उद्ध्वस्त करून ही मशीद बांधली’, असा हिंदु पक्षाचा दावा आहे. याउलट ‘बाबरने ही मशीद बांधली नाही’, असे मुसलमानांचे म्हणणे आहे. त्यांचे म्हणणे आहे की, बाबरने मशिदीचा जिर्णोद्धार केला असला, तरी ती मोगलांच्या काळात बांधली नव्हती. ती त्यापूर्वीही तिथे होती आणि बहुधा महंमद बिन तुघलकच्या कारकीर्दीत बांधली गेली असावी.’ मुसलमान पक्षाचा दावा आहे, ‘बाबर लोधींचा पराभव करून संभल येथे आला होता. मशिदीची वास्तू पहाता ती मोगल काळातील नाही, हे सूचित होते. त्याच वेळी मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली आहे’, असा दावा हिंदु पक्ष करत आहे. पुरावा म्हणून त्यांनी ‘भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणा’चा जुना अहवाल आणि बाबरनामा यांचा उल्लेख केला आहे. पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणाचा अहवाल १८७४-१८७५ या वर्षीचा आहे, जो वर्ष १८७९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. या सर्वेक्षणाचे नेतृत्व तत्कालीन पुरातत्व अधिकारी एस्.ई.एल्. कार्ले यांनी केले होते. या अहवालामुळे मशिदीच्या ठिकाणी मंदिर असल्याच्या हिंदु पक्षाच्या दाव्याला पुष्टी मिळते.

२. अहवालामध्ये काय आहे ?

संभलमध्ये असलेली जामा मशीद ही मूलतः हरिहर मंदिर असल्याचा हिंदूंचा दावा आहे. त्यात मध्यवर्ती घुमटाच्या आकाराची २० चौरस फूट खोली आहे. पुष्कळ उंच असे दोन भाग आहेत. त्यातील उत्तर बाजू ५० फूट ६ इंच, तर दक्षिण बाजू केवळ ३८ फूट १ इंच आहे. प्रत्येक भागासमोर ३ कमानीदार दरवाजे आणि सर्व वेगवेगळ्या रुंदीचे आहेत. ‘सम्राट बाबर याच्या काळात ही इमारत बांधण्यात आली. मशिदीच्या आतील शिलालेखाचा उल्लेख करून त्यावर बाबरचे नाव स्पष्टपणे लिहिलेले आहे’, असे सांगतात; परंतु हिंदूंचा दावा आहे की, हे खोटे आहे आणि याचा दिनांक नंतरचा आहे. या फरशीवर किंवा त्याच्या मागे मंदिराशी संबंधित मूळ हिंदु शिलालेख आहेत.

३. मुसलमानांची संमती

बाबरच्या नावाचा शिलालेख खोटा आहे किंवा त्याच्या थोड्या आधी, म्हणजे अनुमाने २५ वर्षांपूर्वी मुसलमानांना या इमारतीचा ताबा मिळाला होता, अशी संभल येथील अनेक मुसलमानांनी माझ्याकडे (तत्कालीन सर्वेक्षण अधिकार्‍याकडे) संमती दिली आहे. त्यांनी बळजोरीने इमारतीवर कब्जा केला होता आणि त्यानंतर जिल्हा न्यायाधिशांसमोर या प्रकरणाचा खटला भरला गेला. मुसलमानांनी मुख्यतः खोटे शिलालेख आणि मुसलमानांशी संगनमत करून ‘अल्पसंख्यांक’ हिंदूंविरुद्ध खोटी साक्ष देऊन हा खटला जिंकला. या अहवालात पुढे लिहिले आहे, ‘संभल येथील हरि मंदिरातील खोट्या शिलालेखात बाबरचे नाव चुकीचे दिले गेले आहे, असे दिसून येते. शिलालेखात मी (तत्कालीन सर्वेक्षण अधिकार्‍याने) बादशाहचे नाव ‘शाह जाम फुलहमद बाबर’, असे वाचले; परंतु त्याचे खरे नाव ‘शाह झहीर-उद-दीन महंमद बाबर’ होते. या इमारतीचा घुमट कदाचित् एक प्रकारे अद्वितीय आहे. हा घुमट पृथ्वीराज चौहान यांच्याशी संबंधित असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

४. हिंदु मंदिर असल्याचा दावा

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, ‘सेंट्रल स्क्वेअर’ शैलीतील हिंदु मंदिराच्या भिंती दगडाने झाकलेल्या मोठ्या विटांनी बनलेल्या आहेत, असे दिसते; परंतु मुसलमानांनी भिंतींवर लावलेल्या प्लास्टरमुळे त्या कोणत्या साहित्यापासून बनवल्या आहेत, ते लपले जाते. तत्कालीन सर्वेक्षण अधिकारी सांगतात, ‘अनेक ठिकाणी जेथे प्लास्टर तुटलेले होते तिथे काही ठिकाणी दगड दिसत होते’, असे मला आढळून आले. मला वाटते की, मुसलमानांनी बहुतेक दगड काढले. विशेषतः हे दगड हिंदु धर्माचे प्रतीक म्हणून पाहिले जात होते. मजला बनवण्यासाठी हे दगड अशा प्रकारे वापरले गेले होते की, त्यावर बनवलेल्या मूर्ती खालच्या बाजूला ठेवल्या गेल्या.’

सर्वेक्षण अहवालात पुढे म्हटले आहे, ‘दगडाच्या आच्छादनाच्या वेळी भिंती पुष्कळ जाड होत्या, हे कळून येत होते. अशा खुणा मी (तत्कालीन सर्वेक्षण अधिकारी) पाहिल्या. मंदिराच्या बाहेरील प्रांगणातील पायर्‍यांखाली मला लाल वाळूतील शिल्पकलेचे काही तुकडे दिसले, ज्यापैकी एक पन्हाळी स्तंभाचा वरचा भाग होता. मशिदीत रूपांतरित करण्यासाठी इमारतीत जोडण्यात आलेले मुसलमान धाटणीचे भाग लहान विटांनी बनलेले आहेत. याचाच अर्थ जिथे जिथे भिंतींवर प्लास्टर नव्हते, तिथे विटा लहान होत्या आणि मातीचा चिखल करून त्या बसवल्या होत्या, असे मला आढळले.’

५. हरिहर मंदिर आणि जामा मशीद यांमधील भेद

अहवालानुसार जुने हिंदु पद्धतीचे आणि नंतरच्या काळात केलेले इस्लामी पद्धतीचे काम यांमध्ये पुष्कळ अंतर आहे. जुने हरिहर हिंदु मंदिर इस्लामी जोडणीपासून वेगळे आहे, असे केवळ एकदाच ओळखता येते. चौरस हिंदु मंदिराला मूलतः पूर्वेकडील भिंतीमध्ये ८ फूट रुंद असा केवळ एक दरवाजा होता; परंतु मुसलमानांनी आणखी ४ दरवाजे बांधले. त्यामुळे मशिदीच्या मुख्य दरवाजासमोर हिंदु आणि मशिदीच्या उर्वरित ४ दरवाज्यांसमोर मुसलमान लोक रहातात, हे स्पष्ट होते.