आर्मेनियातील यझिदी नेत्याने संयुक्त राष्ट्रांत भारताने त्यांना समर्थन करण्यासाठी केले आवाहन !

भाग्यनगर (तेलंगाणा) – ‘इस्लामिक स्टेट’कडून छळलेल्या इराकी धार्मिक अल्पसंख्यांक यझिदी समुदायाच्या नेत्याला आशा आहे की, भारत त्यांचे सूत्र संयुक्त राष्ट्रांत उपस्थित करून त्यांना साहाय्य करील. आर्मेनियातील ‘यझिदी नॅशनल युनियन’चे अध्यक्ष खादर हझोयान यांनी भाग्यनगर येथील ‘लोकमंथन २०२४’ मध्ये ही अपेक्षा व्यक्त केली.

१. खादर हझोयान म्हणाले की, वर्ष २०१५ मध्ये भारतात आलो होतो. त्या वेळी धर्मगुरु श्री श्री रविशंकर यांच्यासह अनेक संस्थांनी यझिदींना मानवतावादी साहाय्य केले होते. आम्हालाही राष्ट्रीय स्तरावर यझिदींचे संरक्षण हवे आहे. आम्हा यझिदींना आमचा कोणताही देश नाही. आपल्या समस्या जगासमोर मांडण्याची शक्ती भारतामध्ये आहे.

२. वर्ष २०१४ मध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी उत्तर इराकमध्ये सहस्रो यझिदींची हत्या केली आणि महिला अन् मुली यांना बलपूर्वक लैंगिक गुलाम बनवले. अजूनही याझिदी मुली आणि महिला तेथे बंदीवान आहेत. कुर्द लोकांनी यझिदींना ‘सैतानाचे उपासक’ म्हणून घोषित केले आहे.