आध्यात्मिक स्तरावर राहून साधकांना अविरत मार्गदर्शन करणार्या पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांचा पू. शिवाजी वटकर यांच्याशी झालेला संवादरूपी सत्संग !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मी देवद आश्रमात ११ वर्षे वास्तव्यास आहे. गुरुकृपेने आश्रमातील साधकांना साधनेसाठी आधार म्हणून पू. (सौ.) अश्विनी पवार (पू. ताई) लाभलेल्या आहेत. त्या साधना आणि सेवा यांविषयी साधकांना मार्गदर्शन करतात. २७.१०.२०२० या दिवशी रात्री ८ वाजता कसलेही नियोजन नसतांना अकस्मात् आमची भेट झाली. ‘त्यांना ५ – १० मिनिटे वेळ आहे का ?’, असे विचारून मी त्यांच्याशी बोलू लागलो. आम्ही २ घंट्यांपेक्षा अधिक वेळ संवादरूपी सत्संगात होतो. तेव्हा ‘मला शिकण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी हे ईश्वरी नियोजन होते’, असे वाटले. पू. ताईंची चैतन्यमय वाणी ऐकून मला जे थोडेफार आत्मसात् झाले, ते मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण करत आहे.
१. गुरूंनी आपले म्हटल्यावर सर्व कार्य आपोआप होत असणे
पू. वटकर : आता तुम्हाला भेटल्यावर मला पुष्कळ आनंद होत आहे. ‘तुमची साधना आणि सेवा चांगली चालू आहे’, असे मला वाटते. याविषयी मला शिकण्यासाठी सांगू शकाल का ?
पू. ताई : मी काय सांगणार ? मी तसे काहीच करत नाही.
पू. वटकर : पूर्वी तुम्ही बोलावल्यावरही मला वाटायचे की, ‘पू. ताईंनी मला बोलावले, म्हणजे मला पुष्कळ शिकायला मिळेल; पण आता वाटते की, शिकायला मिळण्यासह भावाच्या स्तरावर रहायला मिळेल. तुम्हालाही माझ्यासाठी नियोजन करावे लागायचे; पण आता हे सहजपणे झाले. यामुळे ‘तुमची पुष्कळ प्रगती होत आहे’, असे मला वाटते.
पू. ताई : मलाही अशा पुष्कळ अनुभूती येतात. आजच सकाळी असे झाले, मी सत्संगाला जाण्याची सिद्धता करत असतांना मला आठवले की, एक साधिका मला तातडीच्या सूत्रांविषयी आढावा देणार होती आणि तेवढ्यात ती साधिका आढावा देण्यासाठी खोलीत आली. अशा प्रकारे देव माझ्या मनात विचार घालतो आणि ते कार्य होते. येथे ‘माझे’, असे काही राहिले नाही. आपल्याला गुरूंनी आपले म्हटले की, सर्व कार्य आपोआप होते.
२. विश्वमनातून सूचना मिळाल्याने कार्य आणि सेवा आपोआप पूर्ण होणे
पू. वटकर : सर्वसाधारणपणे ‘नियोजन करणे, त्या साधकाला वेळ नसणे, चुकामूक होणे, मनात तेवढा वेळ विचार येत रहाणे’, असे होते. सहजतेने अल्प वेळेत होणार्या गोष्टीला तुमचा अत्यल्प वेळ आणि शक्ती व्यय होते. हे कसे होते ?
पू. ताई : विश्वमनात एखादी घटना घडल्यावर आपल्याला तशी सूचना (नोटिफिकेशन) मिळते. आपल्या मनात तो विचार येतो, उदा. ‘मला साधिका तातडीचे सूत्र सांगणार होती’, असा विचार मनात येणे, म्हणजे आपल्याला तशी आतून सूचना मिळते, तसेच त्या साधिकेकडूनही देव तशी कृती करवून घेतो.
३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सेवा दिली आणि तेच करून घेत आहेत’, असा भाव असणे
पू. वटकर : तुमचा मनोलय झाला असल्याने तुमच्या मनात सहजपणे विचार येतात. तुमच्या मनात काही अपेक्षा नाहीत, प्रतिक्रिया नाहीत. त्यामुळे असे होत असेल.
पू. ताई : मला एखाद्या साधिकेची आठवण येते. तेव्हा ‘तिची प्रकृती ठीक नसेल’, असे मला वाटते. तिला संपर्क केल्यावर तिला बरे वाटत नसल्याचे कळते. हे सर्व गुरुच करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सेवा दिली आणि तेच करून घेतात. एवढेच मला कळते. ‘तसे पाहिले, तर माझे वय लहान आहे आणि मला विशेष अनुभवही नाही; पण गुरूंनी मला लहान समजले नाही. त्यांनी जे दिले, ते पुष्कळ अन् फारच पुष्कळ आहे’, असे मला वाटते.
पू. वटकर : तुम्ही सतत कृतज्ञताभावात असता.
४. साधकांच्या मनाशी एकरूप होता आल्याने त्यांच्या मनाची स्पंदने कळणे आणि सहजपणे चूक सांगता येऊन साधकानेही चूक स्वीकारणे
पू. वटकर : सर्वसाधारणपणे एखाद्याला चूक सांगायची म्हणजे फारच कठीण वाटते.
पू. ताई : माझे मन साधकाच्या मनाशी एकरूप होते. गुरुच ती स्थिती निर्माण करतात. त्या साधकाची स्पंदने माझ्याकडे येतात. ती स्पंदने माझे मन ग्रहण करते. ही प्रक्रिया सहजतेने होते. त्यामुळे चूक सांगणेही हलके होऊन जाते. चूक सांगतांना ‘ताण येणे, जडपणा वाटणे’, असे होत नाही. हे सर्व गुरुच करून घेतात. मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सर्वकाही शिकवले आहे. आपण दुसर्या साधकाची अस्थिरता आणि स्वभावदोष यांचा परिणाम आपल्यावर होऊ देऊ नये. दुसर्याच्या मनाच्या स्थितीला जाणे, म्हणजे त्याची स्पंदने जाणून घेणे. मी केवळ निदान करण्यासाठी त्याच्या मनाच्या स्थितीला जाते. त्यानंतर त्याला जे आवश्यक आहे, ते देव सुचवतो आणि त्याप्रमाणे मी सांगते, म्हणजे मी विश्वमनातून सांगते.
पू. वटकर : ‘पू. ताई मला जी चूक सांगतात, ती माझ्या भल्यासाठी आहे’, असे माझ्यासारख्या साधकाला वाटते. चूक स्वीकारतांना साधकाच्या मनाचा संघर्ष अल्प होतो आणि ‘स्पष्टीकरण द्यावे’, असे वाटत नाही. तुम्ही जे मला सांगत असता, ते माझ्याकडून सहजपणे स्वीकारले जाते. ‘तुम्ही सांगता, म्हणजे माझेच मन मला सांगत आहे’, असे मला वाटते. तुमचे म्हणणे स्वीकारायला मला अडचण येत नाही.
पू. ताई : देवच साधकाच्या मनाशी एकरूपता करवून घेतो. त्या जिवाच्या मनाशी एकरूप झाल्यावर चूक सांगण्याची प्रक्रिया सुलभ होऊन जाते.
५. साधकांना चुका सांगतांना पू. ताईंमध्ये स्थिरता, भाव आणि आनंद जाणवणे, त्या वेळी देवाची तारक अन् मारक रूपे अनुभवणे
पू. वटकर : तुम्ही साधकांना चुका किंवा सुधारणा आत्मीयतेने सांगता. मला वाटते, ‘तुमच्यातील आत्मीयता आणि सहजता यांमुळे हे होते.’ माझ्यासारख्याला नियोजन करून, साधक दुखावला जाणार नाही आणि साधकाची मानसिकता ओळखून हे सांगावे लागते. तुम्ही तुमचे कर्तव्य आणि प्रेमभाव म्हणून सांगता. तुमच्यात सहजता आणि स्थिरता जाणवून माझ्यासारख्या साधकांना त्यातून आनंद मिळतो.
पू. ताई : मलाही स्वतःमध्ये स्थिरता, भाव आणि आनंद जाणवतो. कसलाही ताण-तणाव जाणवत नाही. ‘साधकाला स्वीकारता येईल कि नाही’, असे वाटत नाही. साधकाची स्थिती पाहून त्याला समजेल, अशा रितीने सांगितले जाते. ‘तसे करायला देवच सांगतो’, असे वाटते. हे सर्व माझे नाही, देवाचेच आहे. ‘कठोर होऊन सांगायचे कि प्रेमाने सांगायचे’, हे आवश्यकतेनुसार देवच सांगतो. ती त्याची तारक आणि मारक रूपे आहेत. त्या दोन्ही रूपांमध्ये त्याची प्रीतीच आहे.
पू. वटकर : तुमची स्थिरता आणि सहजता पुष्कळ जाणवते. हे केवळ अनुभवाने येत नाही, तर प्रेमभाव, दुसर्याच्या अस्थिरतेमुळे स्वतः अस्थिर न होणे, तुमची देवावरील श्रद्धा, भाव आणि शरणागती यांमुळे देवच तुमच्याकडून अशा प्रकारे सेवा करून घेतो, हे मला शिकायला मिळाले; परंतु काही वेळा मनाचा संघर्ष होतो का ?
पू. ताई : असे क्वचित प्रसंगात होते, देवच सर्व करून घेत असल्यामुळे त्यातून आनंद मिळतो.
– पू. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(क्रमशः)