Chandigarh Blast : चंदीगडमध्ये २ बाँबस्फोट : जीवितहानी नाही
चंदीगड – येथील सेक्टर-२६ मधील ‘सेव्हिल बार अँड लाऊंज क्लब’ आणि ‘डी ओरा क्लब’ या २ ठिकाणी पहाटे बाँबस्फोट करण्यात आले. यात एका क्लबच्या खिडकीच्या काचा फुटल्या. बाँबस्फोटाच्या वेळी दोन्ही इमारती बंद होत्या. त्यामुळे या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हे स्फोट दहशत पसरवण्यासाठी केले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दोन्ही क्लबच्या मध्ये ३० मीटरचे अंतर आहे. ‘सेव्हिल बार अँड लाउंज क्लब’ हा प्रसिद्ध ‘रॅपर’ (गायनाचा विदेशी प्रकार) बादशाह याच्या मालकीचा आहे. पोलीस या स्फोटांचे अन्वेषण करत आहेत.
येथे बाँब फेकणारा तरुण दुचाकीवरून आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणात समोर आले आहे. ‘देशी बाँब (सुतळी बाँब) फुटले असावेत’, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस खंडणीच्या दृष्टीने या घटनेचे अन्वेषण करत आहेत.
लॉरेन्स बिष्णोई टोळीने घेतले स्फोटाचे दायित्व
गुंड लॉरेन्स बिष्णोई याच्या टोळीतील गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांनी या बाँबस्फोटांचे दायित्व स्वीकारले आहे. दोघांनीही सामाजिक माध्यमांतून पोस्ट करून हे दायित्व घेतले आहे. त्यांनी दावा केला आहे की, ‘हे क्लब ‘रॅपर’ बादशाहच्या मालकीचा आहे. त्याला खंडणीसाठी बोलावण्यात आले होते; परंतु त्याला ते ऐकले नाही. तो आमचे दूरभाष उचलत नव्हता म्हणून त्याचे कान उघडले’, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.