एकादशी आणि संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आळंदीत सहस्रो वारकर्यांची मांदियाळी !
आळंदी (जिल्हा पुणे) – २६ नोव्हेंबरला असलेल्या कार्तिक एकादशी आणि २८ नोव्हेंबरला असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने भगव्या पताका घेतलेले सहस्रो वारकरी ‘रामकृष्ण हरि’च्या गजरात आळंदीत येत आहेत. पंढरपूर येथून श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानाच्या पांडुरंगाच्या पादुका पालखीसह आळंदीत आल्या आहेत. याचसमवेत पंढरपूर येथून निघालेल्या वारकर्यांच्या दिंड्याही आळंदी येथे येत आहेत. पुणे जिल्ह्यातील मुळशी, मावळ, आंबेगाव यांसह अनेक छोट्या छोट्या दिंड्याही आळंदीत येत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी दर्शनासाठी प्रचंड मोठी रांग असून सध्या दर्शनासाठी ४ घंट्यांपेक्षा अधिक काळ लागत आहे. दर्शनाची रांग भक्ती सोपान पुलावरून नदीच्या पुलाकडे गेली आहे.
इंद्रायणी नदीच्या घाटावर विश्व शांती केंद्र येथे हरिनाम सप्ताह चालू आहे. त्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी गेली आहे. नदीत सध्या पाणी सोडले असून स्नानासाठीही मोठ्या संख्येने भाविक घाटावर येत आहेत. त्यामुळे इंद्रायणी घाट सध्या वारकर्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे. संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात २५ नोव्हेंबरला पहाटे ३ ते पहाटे ५ पवमान अभिषेक आणि दुधारती, पहाटे ५ ते सकाळी ११.३० श्रींच्या पादुकांवर भाविकांची महापूजा, दुपारी १२ वाजता महानैवैद्य, तसेच दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन सेवा असे अखंड २४ घंटे कार्यक्रम चालू आहेत.