राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या दुसर्‍या कार्यकाळात इलॉन मस्क आणि रामास्वामी चीनसाठी सर्वांत मोठा धोका !

चिनी सल्लागाराची चेतावणी

रामास्वामी , राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क

बीजिंग (चीन) – इलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी यांच्या नेतृत्वाखालील नवीन विभागासह (डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी – सरकारी कार्यक्षमता विभाग) अन्य सरकारी विभागांचे फेरबदल करण्याची अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची योजना चीनसाठी सर्वांत मोठा धोका ठरू शकते; कारण असे झाल्यास चीनला कार्यक्षम अशा अमेरिकी राजकीय व्यवस्थेशी स्पर्धा करावी लागेल, अशी चेतावणी चीन सरकारचे धोरण सल्लागार झेंग योंगनियन यांनी दिली. इलॉन मस्क हे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत, तर रामास्वामी हे भारतीय वंशाचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. योंगनियन हे हाँगकाँग विद्यापिठाच्या शांघाय कॅम्पसच्या ‘स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी’चे अधिष्ठाताही आहेत.

चीनच्या वार्षिक निर्यातीवर दबाव असेल ! – झेंग योंगनियन

योंगनियन म्हणाले की, अमेरिकी सरकारमधील सुधारणांमुळे चीनवर सर्वांत अधिक दबाव येऊ शकतो. ट्रम्प त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झाल्यास, अमेरिका अधिक स्पर्धात्मक प्रणाली विकसित करेल, ज्याला राज्य भांडवलशाही म्हणता येईल. चीन सरकारचा असा विश्‍वास आहे की, ट्रम्प यांच्या दुसर्‍या कार्यकाळात अमेरिकेच्या करांमध्ये ६० टक्के वाढ झाल्यामुळे चीनच्या वार्षिक निर्यातीवर दबाव येईल. ट्रम्प यांचा भूतकाळ चीनसाठी आव्हानात्मक होता आणि आता ते तैवान आणि दक्षिण चीन सागर या सूत्रांवर  चीनविरोधात कठोर पावले उचलतील, अशी अपेक्षा आहे; मात्र ट्रम्प यांना चीनसमवेत  युद्ध नको आहेे. चीनच्या संरक्षण क्षमतेची झपाट्याने वाढ झाल्यामुळे ट्रम्प युद्धाच्या दिशेने पावले टाकणार नाहीत; परंतु ते दक्षिण चीन समुद्र आणि तैवान सामुद्रधुनीभोवती तणाव वाढवत राहतील. चीन सरकारने ट्रम्प यांना सामोरे जाण्यासाठी धोरण सिद्ध करणे आवश्यक आहे.