‘साधकाला परेच्छेने वागणे किती महत्त्वाचे आहे !’, याची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रसंगांच्या माध्यमातून जाणीव करून देणे
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘४.११.२०२४ या दिवशी दोन प्रसंग घडले. त्यातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला परेच्छेने वागण्याचे महत्त्व शिकवले. ते प्रसंग येथे दिले आहेत.
१. सकाळी संकलनाची सेवा करत असतांना एका धारिकेत ‘एका दैवी बालसाधिकेला श्रीकृष्णाने ‘एकदम ईश्वरेच्छेने वागण्याचा प्रयत्न करण्याऐवजी प्रथम परेच्छेने वाग’, असे सांगितले’, असा उल्लेख होता.
२. सेवा करून प्रसाद ग्रहण करण्यास गेलो असता, तेथे एका साधिकेने दैनिक ‘सनातन प्रभात’मधील आकाशओळ वाचून दाखवली. ती अशी, ‘साधनेमध्ये प्रथम परेच्छेने वागायला हवे. त्यातून आपल्याला ईश्वरेच्छा समजते आणि आपली कृती योग्य होते ! – सद्गुरु राजेंद्र शिंदे’
या दोन प्रसंगांमुळे मला ‘परेच्छेने वागणे किती महत्त्वाचे आहे ?’, हे तीव्रतेने लक्षात आले. ईश्वरेच्छेने वागण्याचा प्रयत्न करतांना ‘इतर साधक सांगतात, ते ईश्वरच सांगत आहे’, असा भाव अहंमुळे रहात नाही. त्यामुळे ईश्वरेच्छा कळत नाही. गुरुदेवांनी अर्ध्या तासाच्या अंतराने घडवलेल्या या दोन प्रसंगांमुळे मला माझ्यामधील तीव्र अहंची जाणीव झाली. गुरूंच्या कृपेमुळेच हे लक्षात आले. ‘माझ्याकडून अहं निर्मूलनासाठी प्रयत्न करून घ्या’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
अहंभावे झाकली मम बुद्धी।
ऐकू येई ना मज गुरुवाणी।। १।।
प्रसंग घडवूनी शिकवती।
परेच्छा असे सर्वाेत्तम ती।। २।।
जाईल अहं तो लयाला।
स्वीकारता परेच्छेला।। ३।।
आलो शरण मी गुरुदेवा।
असावी लीनता सदैव चरणी।। ४।।
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.११.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |