Shahi Masjid Violence : धर्मांध मुसलमानांच्या हिंसाचारांत २ जणांचा मृत्यू, तर २० पोलीस घायाळ !

  • संभल (उत्तरप्रदेश) येथील शाही मशिदीच्या सर्वेक्षणाचे प्रकरण

  • पोलिसांवर दगडफेक, गाड्याची जाळपोळ

  • पोलिसांकडून लाठीमार, अनेकांना केली अटक

शाही जामा मशिद (डावीकडे)

संभल (उत्तरप्रदेश) – दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने येथील शाही जामा मशिदीचे २४ नोव्हेंबरला सकाळी सर्वेक्षण करण्यात येत असतांना धर्मांध मुसलमानांनी  हिंसाचार केला. या वेळी दगडफेक करण्यासह जाळपोळ करण्यात आली. यात २ जणांचा मृत्यू झाला, तर २० पोलीस घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रथम अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि नंतर लाठीमार करून धर्मांध मुसलमानांना पांगवले. सध्या येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

१. सकाळी ६ वाजता हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सरकारी अधिवक्ता प्रिन्स शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र पानसिया, पोलीस अधीक्षक कृष्णा बिष्णोई यांच्यासह सर्वेक्षण पथक मशिदीत पोचले. या वेळी मोठ्या संख्येने पोलीस आणि धडक कृती दल यांचे पथक उपस्थित होते. याची माहिती मिळताच शेजारील धर्मांध मुसलमानांनी सर्वेक्षणाला विरोध करण्यास चालू केले. ‘रविवारी सुटीच्या दिवशी आणि तेही पहाटे कधी सर्वेक्षण केले जाते का ?’ असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. यानंतर येथे सहस्रो मुसलमान गोळा झाले आणि त्यांनी पथकाला विरोध चालू केला.

२. मुसलमानांचा जमाव मशिदीत जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पोलिसांनी रोखून धरले होते. मशिदीमध्ये सर्वेक्षण पथकाकडून सर्वेक्षण चालू केले होते. यानंतर मुसलमानांनी दगडफेक करण्यास चालू केले. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे पोलिसांना पळावे लागले. यानंतर पोलिसांनी अधिक फौजफाटा मागवून लाठीमार केला, तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

३. दिवाणी न्यायालयाने ५ दिवसांपूर्वी मशिदीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. ७ दिवसांत सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. २९ नोव्हेंबरला आता यावर सुनावणी होणार आहे. ही मशीद पूर्वीचे हरिहर मंदिर असल्याचे हिंदूंचे म्हणणे आहे. बाबराच्या काळात म्हणजे वर्ष १५२९ मध्ये मंदिराचे मशिदीत रूपांतर झाल्याचे हिंदू पक्षाने म्हटले आहे. त्यावरून मशिदीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अवघ्या २ घंट्यांनंतर पथकाने छायाचित्र आणि चित्रीकरण करत मशिदीचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतर आता पुन्हा उर्वरित सर्वेक्षण करण्यात येत होते.

हिंसाचार करणार्‍यांवर आयुष्यभर लक्षात राहील, अशी कारवाई करणार ! – पोलीस अधीक्षक

संभलचे पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिष्णोई म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानंतर जामा मशिदीत सर्वेक्षण केले जात होते. मशिदीच्या आत शांततेत सर्वेक्षण चालू होते. जमावातील काही लोकांनी अचानक दगडफेक चालू केली. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत जमावाला पांगवले. कुणी कायदा हातात घेतल्यास कारवाई केली जाईल. ज्या लोकांना कह्यात घेण्यात आले आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जमावाला कुणी भडकावले ते सीसीटीव्हीच्या माध्यमातून ओळखले जाईल. त्यांच्यावर अशी कठोर कारवाई केली जाईल, जी त्यांना आयुष्यभर लक्षात राहील.

सर्वेक्षण पथकाला संरक्षणात काढले बाहेर !

सकाळी सुमारे अडीच घंटे कथित मशिदीमध्ये सर्वेक्षण पथकाने सर्वेक्षण पूर्ण केले. त्यानंतर पोलिसांनी मागील दरवाजाने संपूर्ण संरक्षणात पथकाला येथून बाहेर काढले.

हे देशावर झालेले आक्रमण ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, आता जिहादी लोकांना देशात शरीयत कायदा प्रस्थापित करायचा आहे. त्यांना भारतातील लोकशाही संपवून शरीयत कायदा आणायचा आहे. कायद्यानुसार सर्वेक्षण पथक तेथे गेले होत. असे असतांना त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न म्हणजे कायद्यावर करण्यात आलेले आक्रमण आहे. हे लोकशाहीवरचे आक्रमण आहे. देश हे आक्रमण सहन करणार नाही.

(म्हणे) ‘पुन्हा सर्वेक्षण का केले गेले ?’  – समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांचा प्रश्‍न

समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी म्हटले की, सर्वेक्षण झाले होते, मग ते पुन्हा आणि पहाटेच का केले गेले ? दुसर्‍या पक्षाचे ऐकायला तेथे कुणीच नव्हता. निवडणुका सोडून कशाची चर्चा करायची हे भाजप ठरवू शकतो; म्हणून हे केले गेले आहे.

जे काही घडले ते भाजप आणि प्रशासन यांनी मिळून केले जेणेकरून निवडणुकीतील अप्रामाणिकपणाची चर्चा होऊ नये.

सर्वेक्षण करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता आणि त्याची कार्यवाही केली जात होती, हे स्पष्ट असतांना अशा प्रकारचे प्रश्‍न विचारून अखिलेश यादव धर्मांध मुसलमानांच्या हिंसाचारावर पांघरूण घालत आहेत, हे लक्षात घ्या ! अशा पक्षांमुळेच हिंदू या देशात असुरक्षित, तर धर्मांध उद्दाम झाले आहेत ! – संपादकीय भूमिका 

महिला आणि मुले यांना पुढे करून दंगलखोरांना करायचे होते पथकावर आक्रमण ! – पोलीस आयुक्त

पोलीस आयुक्त अंजनेय कुमार सिंह म्हणाले की, दंगलखोरांना नियोजनबद्ध पद्धतीने सर्वेक्षण पथकाला लक्ष्य करायचे होते. १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुले आणि महिल यांना यासाठी पुढे करण्यात आले.’

हिंसाचारामागे समाजवादी पक्षाचा हात ! – आचार्य प्रमोद कृष्णम् यांचा आरोप

या घटनेविषयी आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी म्हटले की, राज्यातील पोटनिवडणुकीतील पराभवानंतर समाजवादी पक्षाचे नेते हवालदिल झाले आहेत. संभलमधील हिंसाचारामागे त्याचा हात आहे. योगी आदित्यनाथ सरकारने येथे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

संपादकीय भूमिका 

  • न्यायालयाच्या आदेशाने होणार्‍या सर्वेक्षणाला विरोध करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. न्यायालयाचा हा अवमान असल्याने न्यायालयानेही यावर आदेश द्यावा, असेच कायदाप्रेमी जनतेला वाटते !
  • जे न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करत नाही, ते उद्या न्यायालयाने ‘ही मशीद हिंदूंचे मंदिर असल्याने त्यांना सोपवण्यात यावी’, असा आदेश दिल्यावर ते स्वीकारतील का ?, असा प्रश्‍न उपस्थित होतो !
  • ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे राजकीय पक्ष याविषयी का बोलत नाहीत ?