६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे वेळवंड (भोर, जिल्हा पुणे) येथील कै. रावजी पांगुळ (वय ७७ वर्षे) यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने जाणवलेली सूत्रे !

कै. रावजी अर्जुना पांगुळ (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे ७.१२.२०२३ या दिवशी वयाच्या ७७ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. २५.११.२०२४ या दिवशी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्ताने सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारे त्यांचे पुतणे श्री. रामचंद्र दगडू पांगुळ आणि सून सौ. आनंदी पांगुळ यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. रावजी पांगुळ

१. श्री. रामचंद्र पांगुळ 

श्री. रामचंद्र पांगुळ

१ अ. ‘कै. अण्णांना चांगली गती मिळाली आहे’, असे वाटणे : ‘आमच्या घरातील एखादी व्यक्ती मृत पावल्यावर माझ्या मनात त्या व्यक्तीविषयी पुष्कळ भावनिक विचार येतात’, असे यापूर्वी मी माझी आजी आणि आई यांच्या मृत्यूनंतर अनुभवले होते. ‘माझे चुलते कै. रावजी पांगुळ (अण्णा) वारल्यानंतर मात्र त्यांना चांगली गती मिळाली आहे’, असे मला वाटत आहे.

‘केवळ परम पूज्य डॉक्टरांच्या कृपेमुळे कै. अण्णांचा मृत्यूनंतरचा प्रवास चांगला झाला’, असे वाटून मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.

१ आ. घरी नामजप सहजतेने होणे : घरी मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतो. तेव्हा तो सहजतेने होतो. ‘मी केलेला नामजप कै. अण्णांपर्यंत पोचत आहे आणि मला ‘त्यांचा अन् श्री दत्तात्रेयांचा आशीर्वाद लाभत आहे’, असे मला जाणवते.

१ इ. कै. अण्णांचा विचार मनात आल्यास आनंद वाटणे आणि ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना आपल्या चरणांशी घेतले आहे’, असे मनात येणे : काही वेळा मला मृत व्यक्तींची स्वप्ने पडतात किंवा त्यांच्यासमवेत घालवलेले क्षण आठवून कधी भीतीही वाटते. त्यांची आठवण आल्यास माझ्या मनात पुष्कळ भावनिक विचार येत रहातात; परंतु या वर्षभरात मला चुलत्यांविषयी कोणतेही विचार न येता आनंदच जाणवतो. ‘चुलत्यांची साधना चालू असून परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना आपल्या चरणांशी घेतले आहे’, असे विचार पुष्कळ वेळा माझ्या मनात येतात.

१ ई. परात्पर गुरु डॉक्टरांच्या वाक्याची, ‘घरातील एक व्यक्ती साधना करत असेल, तर तिच्या साधनेने अनेक पिढ्यांचा उद्धार होतो’, याची प्रचीती येणे : कै. अण्णा ‘अन्य पूर्वजांनाही साहाय्य करत आहेत’, असे मला जाणवते. परम पूज्यांनी एका प्रवचनात सांगितले आहे, ‘घरातील एक व्यक्ती साधना करणारी असेल, तर तिच्या साधनेने घरातील अनेक पिढ्यांचा उद्धार होत असतो.’ हे मला यातून अनुभवायला मिळत आहे.

१ उ. घरात लावलेल्या कै. अण्णांच्या छायाचित्राकडे पाहून चांगले वाटणे : या वर्षभरात मी पुष्कळ वेळा गावी जाऊन आलो; परंतु ‘घरात अण्णा नाहीत किंवा घरात अस्वस्थता वाढली आहे’, असे मला कधी जाणवले नाही. घरातील वातावरण नेहमीसारखे आनंददायी जाणवते. घरामध्ये अण्णांच्या छायाचित्राकडे पाहून चांगले वाटते. हे केवळ ‘त्यांनी केलेली साधना आणि परम पूज्यांनी त्यांच्या चरणांजवळ घेतल्यामुळे होत असलेली त्यांची साधना’ यांचे फळ आहे’, असे मला जाणवते.’

२. सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ 

सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

२ अ. भरणी श्राद्धाच्या वेळी घरात पुष्कळ चैतन्य जाणवून ‘कै. अण्णांसमवेत महर्लाेकातील पुष्कळ साधक घरी आले आहेत’, असे जाणवणे : ‘माझे चुलत सासरे (अण्णा) यांचे २१.९.२०२४ या दिवशी प्रथम भरणी श्राद्ध होते. श्राद्धासाठी मी गावी (वेळवंड, भोर येथे) गेले असतांना मला घरात कुठेच जडपणा न जाणवता पुष्कळ चैतन्य जाणवत होते. ‘भरणी श्राद्धविधी चालू झाल्यावर वातावरणातील चैतन्यात वाढ झाली’, असे लक्षात आले. तेव्हा ‘कै. अण्णांसमवेत महर्लाेकातील पुष्कळ साधक आमच्या घरी आले आहेत’, असे मला जाणवत होते. तेव्हा ‘आमच्या घरातील अन्य पूर्वजांना सत्संग देणे आणि त्यांना साधना सांगणे’, यांसाठी महर्लाेकातील साधक आले आहेत’, असा विचार आला.

२ आ. ‘कै. अण्णा पुष्कळ आज्ञाधारक असल्याने त्यांची गतीने प्रगती होत आहे’, असे मला जाणवते. 

‘एखाद्या साधकाच्या मृत्यूनंतरही त्याच्याकडून साधना करून घेणे, त्याच्या जीवित आणि मृत कुटुंबियांची काळजी घेणे’, हे केवळ आणि केवळ श्रीकृष्णासम असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच करू शकतात. त्यांच्या चरणी कोटीशः प्रणाम !’

(सर्व सूत्रांचा दिनांक १६.११.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक