महाराष्ट्रात ‘नोटा’ला नकार, महायुतीला बहुमत देण्याकडे जनतेचा कल !

मुंबई, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – वर्ष २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ७ लाख ४२ सहस्र १३४ मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला होता. वर्ष २०२४ च्या निवडणुकीत एकूण मतदानामध्ये ४.९५ टक्के इतकी वाढ होऊनही नोटाचा पर्याय वापरणार्‍या मतदारांच्या संख्येत मात्र घट झाली. विधानसभेच्या या निवडणुकीत ४ लाख ६१ सहस्र ८८६ मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला. म्हणजे वर्ष २०१९ च्या तुलनेत या विधानसभेच्या निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय वापरणार्‍यांच्या संख्येत २ लाख ८० सहस्र २४८ इतकी घट झाली. याचा अर्थ नागरिकांचा कल महायुतीला बहुमत मिळवून देण्याकडे होता, असे विश्लेषकांचे मत आहे.

नोटा म्हणजे काय ?

निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारापैकी कुणीही उमेदवार योग्य वाटत नसेल, तर निवडणूक आयोगाने ठेवलेला पर्याय म्हणजे ‘नोटा’ हे बटण होय. ‘नोटा’ याचा अर्थ ‘नन ऑफ द अबाव्ह’ (वरीलपैकी नाही) असा होतो. निवडणूक लढवणार्‍यांपैकी एकही उमेदवार मतदान करण्यासाठी पात्र नाही’ म्हणजे ‘नोटा’ला मत होय.