विधानसभा निवडणूक निकालाला माजी सरन्यायाधीश डी. वाय. धनंजय चंद्रचूड उत्तरदायी !
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे विधान !
मुंबई – विधानसभा निवडणूक निकालाच्या संदर्भात जे काही घडले, त्याला देशाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. धनंजय चंद्रचूड उत्तरदायी आहेत, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश असतांना जर वेळेवर आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिला असता, तर या गोष्टी घडल्याच नसत्या. तुम्ही निकाल देणार नसाल, तर मग त्या खुर्चीवर का बसला होता ?’, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, ‘‘सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पद्धतीने निर्णय दिला नाही. यासाठी इतिहास त्यांना क्षमा करणार नाही. जर चंद्रचूड यांनी योग्य निकाल दिला असता, तर महाराष्ट्रातील चित्र पालटले असते. चंद्रचूड यांनी निर्णय न दिल्याने पक्षांतराच्या खिडक्या ते उघड्या ठेवून गेले. त्यामुळे इतिहासात त्यांचे नाव काळ्या अक्षरांत लिहिले जाईल.’’