संत आध्यात्मिक बिघाडांचे अचूक निदान करून योग्य ती साधनयोजना करतात !
‘पॅथॉलॉजी’ (रोगनिदानशास्त्र) शिकलेला एक आधुनिक वैद्य श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना) भेटला. तो म्हणाला, ‘आम्ही रक्त, लघवी, थुंकी इत्यादी सूक्ष्मदर्शक यंत्रांमधून पडताळतो आणि कोणत्या जंतूंच्या संसर्गामुळे शरिरात बिघाड झाला आहे, हे शोधून काढतो. त्यामुळे रोगाचे अचूक निदान होते आणि अचूक औषधयोजना करता येते. त्यामुळे रोगी लवकर बरा होतो.’ श्रीमहाराजांनी आधुनिक वैद्याचे कौतुक केले आणि त्याला म्हणाले, ‘संत, सद्गुरु किंवा सत्पुरुष यांच्या अंकित जी माणसे होतात, त्यांच्या वृत्तीत कुठे बिघाड होत आहे, हे जसे तुम्हाला दुर्बिणीने कळते, तसे संतांना अतींद्रिय ज्ञानाने कळते. त्यामुळे तुम्ही जसे रोगाचे अचूक निदान करता तसे वृत्तीत कुठे बिघाड आहे, याचे अचूक निदान संतांकडून होते. मग वृत्ती सुधारण्यासाठी काय साधना करावी, याचे ते मार्मिक मार्गदर्शन करतात. असे केल्याने साधकाची परमार्थात प्रगती पुष्कळ झपाट्याने होते; म्हणून संतांना शरण जाणे अत्यंत हितावह असते. यातच संतांची महती आहे.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)