सामाजिक माध्यमे शाप कि वरदान ?
सामाजिक माध्यमांच्या वापरामुळे मुलांवर होणारे घातक परिणाम लक्षात घेत ऑस्ट्रेलिया सरकारने १६ वर्षांखालील मुलांना सामाजिक माध्यमांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मध्यंतरी याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. याविषयीचा कायदा लागू झाल्यानंतर १६ वर्षांखालील मुले सामाजिक माध्यमांचा वापर करणार नाहीत, याचे संबंधित आस्थापनांना दायित्व घ्यावे लागेल. सामाजिक माध्यमे ही मनोरंजन आणि माहिती यांचे महत्त्वाचे साधन निश्चितच आहे. जगभरात काय घडते, हे क्षणार्धात या माध्यमांमधून समजते; परंतु कोणत्याही गोष्टींचा अतिरेक निश्चितच योग्य नव्हे. आजची मुले ही देशाचा भावी आधारस्तंभ असल्याने ती आदर्श असायला हवीत, यासाठी सामाजिक माध्यमांचा चुकीचा वापर टाळून या सर्वांचा वापर राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी केल्यास त्यांचा निश्चितच लाभ होईल.
ज्या वयात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, त्या वयात आजची तरुण पिढी सामाजिक संकेतस्थळाच्या मोहात अडकून त्यांचा अमूल्य वेळ वाया घालवत आहे ! सामाजिक माध्यमांच्या अतीवापरामुळे कुटुंबातील आपापसांतील संवाद न्यून झाला आहे. मुलांमधील आक्रमकता आणि चंचलता वाढली आहे. पालक-मुले यांच्यामधील सुसंवाद न्यून झाला आहे. याकडे पालकांनी लक्ष देऊन मुलांना नैतिकता शिकवण्याची आवश्यकता आहे. (हीच स्थिती पालकांचीही झाली आहे.) आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी विज्ञानाचा उपयोग मानवाच्या हितासाठी केला. मोहग्रस्त होऊन तात्कालिक सुखाच्या मागे धावण्याची शिकवण त्यांनी दिली नाही, तर सतत टिकणारा आनंद आणि मनःशांती यांचा शोध घेण्याची शिकवण त्यांनी दिली. हे लक्षात घेता सामाजिक माध्यमांचा उपभोग केवळ तात्कालिक सुख मिळवण्यासाठी केल्यास त्यांच्या मोहजालात आपण फसत जाऊ आणि जीवनातील बहुमूल्य वेळ अन् पैसाही गमावू. याउलट या सर्वांचा वापर राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी, तसेच धर्मशिक्षण देण्यासाठी केल्यास आपले जीवन सार्थकी लागेल.
मुलांनी सामाजिक माध्यमांचा वापर अश्लील व्हिडिओ बघणे, हिंसक व्हिडिओ बघणे अथवा तसे खेळ खेळणे यांसाठी न करता क्रांतीकारकांची चरित्रे अभ्यासणे, त्यागाची भावना निर्माण होण्यासाठी राष्ट्रपुरुषांचा गौरवशाली इतिहास वाचणे अशा प्रकारच्या गोष्टींसाठी केल्यास देशाची भावी पिढी निश्चितच सक्षम अन् राष्ट्रभक्त होईल.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे