उत्तरप्रदेशामध्ये ९ पैकी ७ जागांवर भाजपला आघाडी

नवी देहली- महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभांसह १५ राज्यांतील ४६ विधानसभा आणि २ लोकसभेच्या जागांसाठी मतमोजणी चालू आहे. उत्तरप्रदेशात विधानसभेच्या ९ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. याची मतमोजणीही २३ नोव्हेंबरला झाली आणि त्यात भाजप ७ जागांवर आघाडीवर आहे, तर २ ठिकाणी समाजवादी पक्षाचा उमेदवार आघाडीवर आहे. लोकसभेत उत्तरप्रदेशात भाजपला मोठ्या संख्येने जागा गमवाव्या लागल्या होत्या. त्यानंतर होणार्‍या या पोटनिवडणुका भाजपसाठी महत्त्वाच्या होत्या. यात निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ची (‘विभागले जाल, तर कापले जाल’ची) घोषणा दिली होती. या घोषणाचा योग्य परिणाम झाल्याचे या निवडणुकीतून दिसून येत आहे.

वायनाडमध्ये प्रियांका वाड्रा साडेतीन लाख मतांनी आघाडीवर !

केरळच्या वायनाड येथील लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका वाड्रा साडेतीन लाखांहून अधिक मतांनी पुढे होत्या. त्यामुळे त्यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. येथे माकपचे  सत्यन मोकेरी दुसर्‍या, तर भाजपच्या नव्या हरिदास तिसर्‍या क्रमांकावर आहेत. राहुल गांधी यांनी रायबरेली (उत्तरप्रदेश) आणि वायनाड या २ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि ते दोन्ही ठिकाणांहून विजयी झाले होते. त्यांना एक जागा सोडावी लागणार होती. त्यामुळे त्यांनी वायनाडची जागा सोडली.