उद्योगपतींचे धर्मकार्यात योगदान !
उद्योगपती श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांचा परिचय
श्री. रवींद्र प्रभुदेसाई हे ‘पितांबरी उद्योग समूहाचे’ व्यवस्थापकीय संचालक आहेत. ‘पितांबरी’ उद्योग हा देश-विदेशात कार्यरत आहे. ते उद्योगपती असूनही प्रखर हिंदुत्वनिष्ठ आहेत. हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्नरत असलेल्या विविध संघटनांना ते सदैव प्रोत्साहन देत असतात. उद्योगाच्या माध्यमातून साधना करून त्यांनी एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. ईश्वरावर अपार श्रद्धा, तसेच तन, मन आणि धन यांचा त्याग केल्यामुळे त्यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळीही घोषित झाली आहे.
१. आस्थापनातील सर्वांची ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नती करून घेणे, हे उद्योजकाचे दायित्व !
व्यावसायिक आणि उद्योजक यांनी धर्मकार्यात सहभागी व्हावे, असे मला नेहमी वाटत असते. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चा स्वयंसेवक आणि नंतर ‘विश्व हिंदु परिषदे’चा कार्यकर्ता म्हणून काम करतांना मला सनातन संस्थेशी जोडले जाण्याचे सौभाग्य मिळाले. ‘उद्योजक असूनही आपल्याला धर्मसेवा आणि हिंदु धर्म वाढवण्याची सेवा कशी करता येईल’, हे सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज, प.पू. पांडे महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनामुळे मला समजले. मी काही वर्षांपूर्वी देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमामध्ये प.पू. पांडे महाराज यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला उद्योजकाची एक व्याख्या सांगितली. सर्व दुकानदार, व्यापारी, उत्पादक ज्यांना आपण ‘उद्योजक’ असे म्हणतो, त्या सर्वांना ही व्याख्या लागू आहे. ‘उद् + योजक = उद्योजक. उद् याचा अर्थ त्याचे जे ऐहिक आणि आध्यात्मिक उत्थान आहे. व्यक्तीची ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नती करून घेतो, तो ‘धर्म’, अशी धर्माची व्याख्या आहे. त्यामुळे आपल्या ऐहिक उन्नतीसह आध्यात्मिक उन्नतीही झाली पाहिजे. सध्या कलियुगात अर्थशक्ती आहे आणि तिचा प्रभाव सर्वत्र दिसून मोठ्या प्रमाणात दिसून येतो. जर उद्योगपतींनी अर्थशक्तीकडे लक्ष दिले नाही, तर आपली पुष्कळ हानी होऊ शकते.’ प.पू. पांडे महाराज पुढे म्हणाले, ‘स्वतःचे कुटुंब आणि आस्थापन यांमध्ये जेवढे लोक आहेत, त्या सर्वांची ऐहिक अन् आध्यात्मिक उन्नती करून घेणे, हे आपले दायित्व आहे.’
२. उद्योजकतेच्या माध्यमातून ईश्वराला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न
ही विचारसरणी मला एकदम वेगळी वाटली. मी तिच्याविषयी चिंतन करणे चालू केले. मी सनातन संस्थेशी जोडला गेल्यामुळे माझी नाम, सत्संग आणि सत्सेवा चालू होती. ‘पितांबरी’ हे पितळी आणि तांबे यांची भांडी घासण्याची पूड (पावडर) आहे. आमच्या सर्वेक्षणानुसार पूजेची उपकरणे आणि मूर्ती स्वच्छ करण्यासाठी पितांबरीचा अधिक उपयोग होत आहे. त्यामुळे देवपूजेच्या साहित्यात जशी फुले, धूपकांड्या आणि उदबत्ती असतात, त्यात आता पितांबरीचाही समावेश झाला आहे.
त्यानंतर मी अधिक विचार करू लागलो, ‘आमचे आस्थापन जलद विक्री होणार्या साहित्यात, म्हणजे ‘एफ्.एम्.सी.जी.’मध्ये (फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स) गणले जाते. आपल्या उत्पादनाचे विज्ञापन लक्षावधी लोकांपर्यंत पोचत असते. ‘जो ईश्वराचे गुण किंवा हिंदु धर्माची महानता अधिकाधिक लोकांना सांगतो, तो भगवंताला अधिक आवडतो’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले आहे. सनातन संस्थेने सांगितल्यानुसार या पृथ्वीतलावर ८०० कोटी लोक रहात असतील, तर प्रत्येक व्यक्ती त्याची निराळी साधना करून ईश्वरप्राप्ती करून घेऊ शकतो. त्याप्रमाणे त्यांनी साधनेचे विविध मार्गही दिले आहेत. कलेची साधना करणारे गायक किंवा वादक हेही कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करू शकतात. मलाही असे वाटले की, उद्योजकता हीही एक कलाच आहे. त्यामुळे माझी विचारसरणी एकदम पालटली. गायक हा संगीत गायनाची भक्ती करून ईश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. गायक ईश्वरासाठी गात असतो; परंतु त्याचे गायन ऐकून त्याच्या समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या मनात एक प्रकारचा दैवी आनंद किंवा प्रेमाची भावना निर्माण होत असते. त्याप्रमाणे आम्ही आमचे उत्पादन ईश्वरासाठी बनवून त्याचा उपयोग केला आणि ते करता करता सर्व लोकांना त्याचा आनंद मिळाला.’
३. उत्पादनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार
महाराष्ट्रात आषाढी यात्रा चालू होते, तेव्हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र विठ्ठलमय होतो. वारकरी दंग होऊन भजन म्हणतात, तेव्हा आपल्याही मनात एक चैतन्य आणि चेतना जागृत होते. तेव्हा आम्ही विचार केला की, आपण हिंदु धर्मासाठी काही करू शकतो का ?, ज्याने सर्वांची भक्ती वाढेल. त्यानंतर आम्ही ‘देवभक्ति’ नावाची एक वेगळ्या प्रकारची उदबत्ती निर्माण केली. आपल्या उत्पादनात नाविन्य असेल, तरच लोक ते खरेदी करतील. त्यासह ज्यांना साडेसाती असते, तर त्यांच्यासाठी ‘शनि उपासना’ या नावाने नवीन उदबत्तीचे उत्पादन बनवले. त्यात ‘शनिची भक्ती कशी करावी?’, याविषयी एक माहितीपत्रक दिले. आता आमचे उत्पादन कोट्यवधी लोकांपर्यंत जाते. आपल्या प्रत्येक उत्पादनाच्या वेष्टनवर (पॅकवर) ‘सनातन संस्थेची शिकवण, कुलदेवतेच्या नामस्मरणाचे महत्त्व, आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण कसे करावे ?, पूर्वजांच्या त्रासासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप कसा करावा ?’, अशा अनेक गोष्टी आपण उद्योग करतांना लोकांपर्यंत पोचवू शकतो.
आपल्या धर्मात मंत्रशास्त्र, योगशास्त्र यांसारख्या अनेक गोष्टी आहेत. ‘आंतरराष्ट्रीय योगदिना’निमित्त आदरणीय पंतप्रधान मोदी हेही अमेरिकेत जाऊन त्याचा गौरवाने उल्लेख करतात. एवढ्या महान गोष्टी आपल्याकडे असतांना आपल्यावर (हिंदूंवर) अशी दुःस्थिती का आली ?; याला कारण आपली वेगवान जीवनपद्धत आहे. शिक्षण घेतल्यानंतर आणखी शिक्षण घेऊनही त्यात हिंदु धर्माचा काही परिचय नाही. मोठमोठ्या शहरांमध्ये बहुतांश लोकांना साधनाच ठाऊक नाही किंवा ती निवृत्त झाल्यानंतर करण्याची गोष्ट आहे, असे वाटते.
४. विविध अडचणींवर मात करण्यासाठी साधना हाच उपाय !
भारतात भ्रष्टाचार फार अधिक आहे, तसेच व्यवसायातही पुष्कळ स्पर्धा आहे. त्यामुळे व्यवसाय करतांना उद्योगपतींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा वेळी आपल्याला भगवंताविना दुसरे कुणी साहाय्य करू शकत नाही, असे मला वाटते. त्यामुळे प्रत्येकाने नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा. नामस्मरण किंवा साधना यांमुळे आपली सात्त्विकता वाढते. सात्त्विक विचार केल्याने आपले मन लवकर एकाग्र करता येते. मन एकाग्र झाल्यानंतर आपल्या समस्यांवर उपायही आपल्याला मिळतात. त्यासाठी साधना वाढवली पाहिजे. आपल्या जीवनातील ६० ते ७० टक्के समस्या या आध्यात्मिक असतात किंवा साधना न केल्यामुळे निर्माण होत असतात. शारीरिक किंवा मानसिक स्वरूपाची अडचण असली, तरी त्यावर साधना हाच एकमात्र उपाय आहे. साधनेविषयी मार्गदर्शन करणारे सनातनिनर्मित पुष्कळ ग्रंथ उपलब्ध आहेत. आपण त्यांचेही साहाय्य घेऊ शकतो.
५. ‘सनातन प्रभात’ नियतकालिके आणि ग्रंथ यांमध्ये विज्ञापने देऊन धर्मकार्यात सहभागी होण्याची संधी !
आपण आपल्या उत्पादनांचे विज्ञापन विविध माध्यमांतून करत असतो. सनातनचीही नियतकालिके आणि ग्रंथ आहेत. त्यामध्ये आपण विज्ञापन दिले, तर एका वेगळ्या प्रकारच्या लोकांपर्यंत आपले उत्पादन पोचते. त्यामुळे ही उद्योजकांसाठी एक फार मोठी संधी उपलब्ध आहे, असे मला वाटते. यासमवेतच आपल्या विविध योजना आणि घोषवाक्ये यांच्या माध्यमातूनही आपण धर्मप्रचार करू शकतो. प्रत्येक जण मंदिरे किंवा अन्य संस्थांमध्ये दानधर्म करत असतात. आपल्या मंदिरांमध्ये उत्सव होत असतात; पण हिंदु धर्माचे शिक्षण देणारे मंदिरे अत्यल्प आहेत.
– श्री. रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, ‘पितांबरी’ उद्योग समूह, ठाणे.
‘पितांबरी’ आस्थापनामध्ये प्रतिदिन सकाळी प्रार्थना आणि हनुमान स्तोत्राचे पठण !
‘पितांबरी’आस्थापनेत १ सहस्र ५०० लोक काम करतात. आमच्या खरेदी विभागातील कर्मचार्यांना बाहेरचे पुरवठादार विचारतात, ‘त्यांना सवलत (कमिशन) किती हवी आहे ?’ मला एक अशी भीती असायची, ‘जर खरेदी विभागातील लोक भ्रष्टाचारी झाले, तर आपल्या आस्थापनाची पुष्कळ हानी होईल.’ त्यांनी भ्रष्टाचार करू नये, असे वाटत असेल, तर आपणच त्यांच्याकडून साधना करून घेतली पाहिजे. त्यांची सात्त्विकता वाढल्यास त्यांना साधनेचा आनंद मिळेल. ‘आपले आस्थापन हे आपलेच आहे आणि ते हिंदु राष्ट्राच्या कार्यात योगदान देते’, असे त्यांना वाटले पाहिजे. आपल्या आस्थापनातील कर्मचारी सात्त्विक असले, तर भ्रष्टाचार होणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी नियमितपणे सत्संग आयोजित करण्यात येतो. यासमवेतच प्रतिदिन सकाळी सर्वजण प्रार्थना करतात, ‘आम्ही आज जे काही काम करणार आहोत, त्यात कोणतीही अडचण येऊ नये आणि सर्वांचे आरोग्य चांगले रहावे.’ त्यामुळे सर्व लोकांमध्ये बंधुभावही वाढतो. त्यानंतर आम्ही सामूहिक ‘भीमरूपी’ हे हनुमानाचे स्तोत्र म्हणतो. त्यामुळेही आम्हा लोकांना पुष्कळ लाभ झाला आहे. आम्ही ११ वेळा हनुमानाचे नामस्मरण करून घेतो. आमच्याकडे १५ विभाग आहेत. या सर्व गोष्टींचे पालन करून घेण्यासाठी प्रत्येक विभागात एका व्यक्तीला दायित्व दिले आहे. अशा प्रकारे आपण आपल्या मुलांकडूनही साधना करून घेतली पाहिजे. आता आपल्याला त्याचे सर्व विस्मरण झाले आहे. त्यामुळे मोठ्या लोकांनी प्रथम स्वतःला साधनेची सवय करून घेणे आवश्यक आहे.
ज्यांच्या मनात श्रद्धा आणि भाव आहे, अशाच लोकांना आम्ही नोकरीवर ठेवतो. अशा प्रकारे आपण आपल्या व्यवसायाला अध्यात्माची जोड दिली, तर आपल्या उत्पादनांची उलाढाल अन् लाभ वाढेल आणि आपल्याला हिंदु धर्माची सेवा करण्याची एक संधीही मिळेल.’
– श्री. रवींद्र प्रभुदेसाई