संपादकीय : एकीचे बळ आणि फळ !
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने २३३ जागांवर आघाडी घेत अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळवल्या. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि उद्धव ठाकरे गट यांच्या महाविकास आघाडीची अक्षरशः धूळधाण उडाली. मतदानाच्या दोन आठवड्यांआधी ‘ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होईल’, असे सर्वांनाच वाटत होते. अशात महायुतीने एकहाती विजय मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले. या दोन आठवड्यांत असे काय घडले की, महाविकास आघाडीची धूळधाण उडाली, हे जाणून घेणे आवश्यक आहे. या निवडणुकीतील जय-पराजयाचे राजकीय विश्लेषण सर्व माध्यमे करतीलच; परंतु सर्वसामान्य हिंदूंच्या दृष्टीकोनातून या जय-पराजयाची कारणमीमांसा करण्यासह सत्ताधार्यांना त्यांच्या आगामी कर्तव्यांविषयी अवगत करणे अगत्याचे आहे.
…यामुळे प्रचाराची दिशाच पालटली !
निवडणुकीच्या प्रचारात आरंभी महाविकास आघाडीने आघाडी घेतली होती. त्यानंतर काही दिवसांतच सत्ताधारी महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेने कमालीची लोकप्रियता मिळवत पारडे महायुतीच्या बाजूने फिरवले. असे असले, तरी शरद पवार, उद्धव ठाकरे आदींच्या सभांतील गर्दी पहाता महायुतीमध्ये धास्ती कायम होती. त्यातच ‘मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी केलेले आंदोलन सरकारला तापदायक, तर विरोधकांना लाभदायक ठरेल’, असा कयास राजकीय धुरिणांनी बांधला होता. अशा परिस्थितीत महायुतीला जर खर्या अर्थाने कुणी तारले असेल, तर ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ! त्यांनी राज्यात प्रचारासाठी येऊन थेट ‘बटेंगे तो कटेंगे’ (विभागले गेलो, तर कापले जाऊ), या घोषणेचा पुनरुच्चार केला. याच घोषणेने भाजपला हरियाणात सत्ता मिळवून दिली होती. ही घोषणा केवळ निवडणुकीतील ‘स्टंट’ नव्हता, तर विकासाच्या स्वप्नांपेक्षा भयावहतेचे वास्तव अधोरेखित करणारी होती. याचा अर्थ ‘हिंदूंना विकास नको’, असे नाही; परंतु सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या घोषणेने प्रचाराची दिशाच पालटली. हिंदूंसमोर राज्यात वक्फ बोर्ड, लव्ह जिहाद, भूमी जिहाद आदींचे संकट प्रकर्षाने मांडण्यात आले. त्याची भयावहता आकडेवारीनिशी समोर आली. यासाठी महायुतीने विशेषतः भाजप आणि शिवसेना यांनी सामाजिक माध्यमांचा पुरेपूर वापर केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून काही मुसलमानांनी १७ प्रश्नांचा संच बनवून तो ते प्रत्येक राजकीय पक्षाकडे घेऊन गेले. जो पक्ष हे प्रश्न सोडवण्याची हमी देईल, त्या पक्षाच्या मागे उभे रहाण्याची भूमिका मुसलमानांनी घेतली.
यामध्ये ‘मुसलमानांविरुद्ध बोलणार्या हिंदुत्वनिष्ठ नेत्यांविरुद्ध कारवाई करणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणे’, आदी काही समाज विघातक मागण्यांचा समावेश होता. महाविकास आघाडीतील काही पक्षांनी या मागण्या मान्य केल्या होत्या. यानंतर मात्र भाजपच्या नेत्यांना याचे गांभीर्य लक्षात येऊन त्यांनी हिंदूंमध्ये जागृती चालू केली. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ‘व्होट जिहाद’विषयी उघडपणे भाष्य करून हिंदूंना एकीचे आवाहन केले. हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी संघ परिवाराने प्रचाराची धुरा सांभाळली. संघ परिवाराच्या सहस्रो कार्यकर्त्यांनी राज्यातील गल्लीबोळ पिंजून काढत जागृती केली. एवढेच नव्हे, तर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अथक प्रयत्न केले, हे विसरता कामा नये. ‘मतदानाला करू नका आळस, तरच वाचेल तुमच्या अंगणातील तुळस आणि मंदिरांवरील कळस !’, अशा प्रकारचे आवाहन अन् जागृती हिंदूंमध्ये करण्यात आली. त्यात अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही आपापल्या परीने योगदान दिले. त्यानंतर भाजपने खर्या अर्थाने प्रचारात आघाडी घेतली. त्या पाठोपाठ अनेक संतांनी हिंदूंना ‘हिरव्या संकटा’ची जाणीव करून देत भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले. अशा प्रकारे भाजपला संतांचे आशीर्वादही लाभले. या सर्वांचा परिपाक, म्हणजे महायुतीचा विजय आहे. तो असाच झालेला नाही. त्यामागे या घडामोडी घडल्या आहेत. हा विजय, म्हणजे समस्त हिंदूंच्या एकीचे बळ आणि फळ आहे. या सर्व तपशीलावरून आपल्या लक्षात येईल की, यंदाचे मतदान हिंदूंनी देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी केले आहे.
नव्या सरकारकडून अपेक्षा !
अर्थात् ही निवडणूक जिंकल्यानंतर आता महायुतीची, विशेषतः भाजप आणि शिवसेना यांची सत्त्वपरीक्षा चालू झाली आहे. हिंदूंना दिलेली आश्वासने त्यांना पूर्ण करावी लागतील. महत्त्वाचे म्हणजे हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना काढण्यासह या हिंदवी स्वराज्यावरचे ‘हिरवे संकट’ दूर करण्यासाठी निर्णायक पावले उचलावी लागतील. भाजपचे कणकवली मतदारसंघाचे ‘फायरब्रँड’ आमदार नितेश राणे यांनी निवडून येताच आता ‘अल्लाहू अकबर नाही, जय श्रीराम’, असे विधान केले. अशीच भूमिका भाजपला यापुढच्या काळात सतत घ्यावी लागणार आहे. राज्यात ‘वक्फ बोर्ड’ नावाची विस्तारवादी संघटना हिंदूंची घरे आणि मालमत्ता यांवर तर दावा सांगत आहेच; परंतु आता अनेक मंदिरांच्या भूमींवरही त्यांनी दावा केला आहे. अशाच प्रकारे भूमी जिहादचेही संकट हिंदूंसमोर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील अनेक गड-दुर्गांवर धर्मांध मुसलमानांनी अतिक्रमण केले आहे. जशी मंदिरे ही हिंदूंसाठी चैतन्याचा स्रोत आहेत, तसे गड-दुर्ग हे हिंदूंसाठी शौर्याचे प्रतीक आहेत. धर्मांधांच्या भूमी जिहादच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी लढा पुकारलेलाच आहे; पण आता सत्ता आल्यानंतर भाजप आणि शिवसेना यांना मात्र या गड-दुर्गांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवून गड-दुर्ग मुक्त करावे लागतील. त्या पाठोपाठ लव्ह जिहादचे संकटही हिंदूंसमोर ‘आ’ वासून उभे आहे. महाराष्ट्र राज्यातून १३ सहस्रांहून अधिक महिला आणि मुली गायब झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने स्वतः संसदेत दिली आहे. हे गंभीर आहे. त्या लव्ह जिहादमध्ये फसल्या आहेत का ? कि त्यांची मानवी तस्करी झाली आहे ?, हे शोधावे लागेल. यासह मंदिरांचे सरकारीकरण, गोवंश हत्या बंदी कायदा आदींवरही सरकारला हिंदुहिताची भूमिका घेणे क्रमप्राप्त असेल. मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन केली पाहिजेत. सर्वांत मुख्य म्हणजे सरकारला राज्यात बोकाळलेल्या धर्मांध प्रवृत्तींना आळा घालावा लागेल. या सर्व संकटामुळे हिंदू ‘सेफ’ (सुरक्षित) नाहीत. भाजपने ‘एक है, तो सेफ है’ (एकत्र असलो, तर सुरक्षित राहू शकू), अशी घोषणा दिली आहे. आता त्याने वरील हिंदुहिताचे निर्णय घेऊन हिंदूंसाठी खर्या अर्थाने ‘सेफ’ वातावरण निर्माण करणे अपेक्षित आहे. असे केल्यास पुढील निवडणुकीत हिंदू त्यांना प्रचार करण्याचीही आवश्यकता भासू देणार नाहीत, हे निश्चित !
भाजपप्रणीत महायुती सरकारने आता धडकपणे हिंदुहिताचे निर्णय घेऊन हिंदूंना आश्वस्त करणे अपेक्षित ! |