‘स्वभावाला औषध नाही’, असे म्हणून दुःखीकष्टी जीवन जगण्यापेक्षा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ प्रक्रियेनुसार प्रयत्न करून आनंदी जीवन जगा !

‘कलियुगातील सध्याच्या काळात मानवामध्ये पुष्कळ स्वभावदोष आणि अहं आहेत. त्यामुळे त्याचे जीवन अत्यंत दुःखी आणि कष्टी झाले आहे. ‘यातून बाहेर पडण्याचे काही मार्ग आहेत’, हे त्याला ठाऊक नाही. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहस्रो साधक स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी त्यांनी निर्माण केलेली प्रक्रिया राबवून सुखी अन् आनंदी जीवन जगत आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधकांचे कुटुंबीय, ‘सनातन प्रभात’चे वाचक, विविध संप्रदायांनुसार साधना करणारे साधक, हिंदुत्वनिष्ठ, हितचिंतक आणि सर्वसामान्य व्यक्ती या सर्वांनीच आपल्या जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ‘ही प्रक्रिया का राबवायला हवी ?’, हे पुढील लेखातून लक्षात येईल.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

१. मनाचे कार्य

‘मन’ या शब्दाचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक वेळा करत असतो. याची काही उदाहरणे पाहूया.

१ अ. मनाची नकारात्मकता दर्शवणारी वाक्ये

  •  मनाप्रमाणे वागू नको.
  •  कुणाचे मन दुखवू नको.
  •  माझे मन उदास आहे.
  •  माझे मन अस्वस्थ / अस्थिर आहे.
  • तो बोलला, ते माझ्या मनाला लागले.
  •  माझे मन कशातच रमत नाही.
  •  माझ्या मनाप्रमाणे घडत नाही.
  •  मनाविरुद्ध घडले की, माझं डोकं फिरते.
  •  मनाला टोचणी लागली आहे.
  •  माझे मन सैरभैर झाले आहे.
  •  याच्या मनात एक आणि ओठावर एक असते.
  •  याचे मन फारच चंचल आहे.
  •  याच्या मनात फार नकारात्मक विचार असतात.
  •  याच्या मनावर वाईट संस्कार रुजले आहेत.
  •  बुद्धीने मला सर्व पटते; परंतु माझे मन माझे ऐकतच नाही.
  •  माझे मन उद्विग्न झाले आहे.
  •  माझे मन ठिकाणावर नाही.
  •  माझे मन एकाग्र होत नाही.
  •  रिकामे मन भुताचे घर !
  •  मन चिंती, ते वैरी न चिंती ! इत्यादी.

१ आ. मनाची सकारात्मकता दर्शवणारी वाक्ये

  •  माझे मन आनंदी आहे.
  •  मला मनपसंत पत्नी मिळाली.
  •  याच्या मनावर चांगले संस्कार रुजले आहेत.
  •  ते वाक्य माझ्या मनावर कोरले गेले आहे.
  •  मन स्वच्छ आणि निर्मळ असायला हवे.
  •  त्याचा स्वभाव मनमिळाऊ आहे.
  •  याचे मन सक्षम आहे.
  •  निर्मळ मनात भगवंताचा वास असतो.
  •  मनावर विजय मिळवला की, जगावर मिळवता येतो इत्यादी.

२. व्यक्तीच्या मनाची स्थिती, त्या व्यक्तीतील गुण किंवा स्वभावदोष दर्शवते

अ. मनाची नकारात्मकता दर्शवणारी वरील वाक्ये व्यक्तीतील स्वभावदोषांची तीव्रता दर्शवणारी आहेत, तर सकारात्मकता दर्शवणारी वाक्ये स्वभावातील गुण दर्शवणारी आहेत. वरील वाक्ये वाचल्यावर ‘मन आपल्या जीवनात किती महत्त्वाची भूमिका बजावत असते ?’, हे सहज आपल्या लक्षात येऊ शकते.

आ. जसे डोळ्यांचे कार्य ‘पहाणे’ आणि कानांचे कार्य ‘ऐकणे’ आहे, तसे मनाचे कार्य ‘विचार करणे’, हे आहे. ‘माणसाच्या मनात दिवसभरात किती विचार येतात ?’, याविषयी वर्ष २००५ मध्ये ‘नॅशनल सायन्स फाऊंडेशन’ यांनी एक संशोधनात्मक लेख प्रसिद्ध केला होता. त्या संशोधनाचा निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहे.

‘दिवसभरात माणसाच्या मनात १२ सहस्र ते ६० सहस्र विचार येतात. त्यातील ८० टक्के विचार हे नकारात्मक विचार असतात. नकारात्मक विचारांचे प्रमाण धक्कादायक आहे.’

वातावरणातील वाईट शक्ती माणसाच्या मनातील नकारात्मक विचार मोठ्या प्रमाणात वाढवून मानवाला अस्वस्थ करत असतात. ते सतत त्याला दुःखी करण्याला कारणीभूत ठरतात.

३. विचारांची निर्मिती अंतर्मनातून होणे

मनाचे २ भाग आहेत. एक अंतर्मन आणि दुसरे बाह्यमन. बाह्यमनाच्या ९ पट मोठे अंतर्मन आहे. या अंतर्मनात मानवाच्या सहस्रो जन्मांच्या लक्षावधी स्मृती साठवलेल्या असतात. स्थळ, काळ आणि व्यक्ती परत्वे त्या त्या वेळेला त्या स्मृती जागृत होऊन बाह्यमनाकडे त्या विषयीच्या संवेदना येत असतात. त्याला आपण ‘विचार’ म्हणतो. अंतर्मनातील या स्वभावदोषांची केंद्रे नष्ट होत नाहीत, तोपर्यंत मनात विचार सतत येत रहातात.

४. मनुष्याच्या जीवनात सुखापेक्षा दुःखच अधिक असणे

मनाला सुख देणार्‍या स्मृतींपेक्षा दुःख देणार्‍या स्मृती अधिक असतात, ज्यांना आपण स्वभावदोषांची केंद्रे म्हणूया. म्हणूनच संत तुकाराम महाराज सांगतात,

सुख पाहता जवापाडें । दुःख पर्वता एवढें ।। – तुकाराम गाथा, अभंग ८८, ओवी १

अर्थ : माणसाच्या आयुष्यात सुख जवाएवढे (धान्याच्या एका प्रकाराएवढे) अत्यल्प, तर दु:ख पर्वताएवढे मोठे असते.

५. ज्या स्वभावदोषांची केंद्रे प्रबळ असतात, तसा व्यक्तीचा स्वभाव असतो, उदा. आळशी, रागीट, आत्मकेंद्रित, लोभी, कपटी इत्यादी.

६. मानवाला होणार्‍या मनाच्या काही व्याधी

नैराश्य, असंबंध बडबडणे, चिंता किंवा काळजी करणे, निद्रानाश, स्मृतीभ्रंश, स्किझोफ्रेनिया (वास्तविकता ओळखण्याची असमर्थता), वेड लागणे इत्यादी.

७. स्वभावदोष आणि अहं यांच्या तीव्रतेमुळे कौटुंबिक कलह मोठ्या प्रमाणात वाढणे

सध्या कौटुंबिक कलह मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मुले-पालक, भाऊ-बहीण, नातेवाईक, मित्रमंडळी, पती-पत्नी यांचे एकमेकांशी न पटण्याचे एक कारण, म्हणजे त्यांच्यामधील स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता हे आहे. कलियुगातील सांप्रत काळी पती-पत्नी यांचे एकमेकांशी न पटण्याचे प्रमाण प्रचंड आहे आणि त्याचेच पर्यवसान म्हणून सध्या पुष्कळ प्रमाणात घटस्फोट होत आहेत.

८. माणसातील स्वभावदोषांच्या संदर्भातील काही म्हणी 

अ. सुंभ जळला तरी पीळ जात नाही ! 

अर्थ : दोरखंड जळला, तरी त्याचा पीळ जात नाही, तसेच कितीही प्रयत्न केले, तरी माणसाचे स्वभावदोष जात नाहीत.

आ. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ! 

अर्थ : माणसातील स्वभावदोष मेल्याखेरीज जात नाहीत.

इ. स्वभावाला औषध नाही ! 

अर्थ : व्यवहारामध्ये व्यक्तीला ‘आपले स्वभावदोष कसे घालवायचे ?’, हे ठाऊक नसते. त्यामुळे त्याला ‘स्वभावाला औषध नाही’, असे वाटते.

ई. ‘मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ।’ (त्रिपुरातापिन्युपनिषद्, उपनिषद् ५, श्लोक ३)

अर्थ : मनुष्याचे मनच बंध आणि मोक्ष यांचे कारण आहे.

९. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून मनावर विजय कसा मिळवावा, याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शिकवणे  

९ अ. गुरुकृपायोग साधनामार्गानुसार स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मुलन : मनाचे जीवनातील महत्त्व जाणून सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करण्याची शास्त्रोक्त पद्धत शोधून ‘आपल्यातील स्वभावदोष अन् अहं कसे अल्प करावेत ?’,याचे शिक्षण साधकांना दिले. याचा उपयोग करून सनातनच्या सहस्रो साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या विळख्यातून आपली सुटका करून घेतली आहे, तसेच साधकांनी स्वभावदोषांवर प्रक्रिया करून ते घालवण्यासह उत्तम गुण स्वतःमध्ये रुजवून त्याला साधनेची (टीप) जोड देऊन सुख-दु:खाच्या पलीकडे असणारा आणि सुखापेक्षा अनंत पटींनी श्रेष्ठ असणारा आनंद प्राप्त केला आहे.

टीप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगितला आहे. यामध्ये व्यष्टी साधनेची ‘१. स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे २. अहं-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे ३. नामजप ४. सत्संग ५. सत्सेवा ६. भावजागृतीसाठी प्रयत्न करणे ७. सत्साठी त्याग ८. इतरांविषयी प्रीती (निरपेक्ष प्रेम)’, ही अष्टांगे आहेत, त्यासह समष्टी साधनाही आहे.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी लिहिलेली सनातनची उपयुक्त ग्रंथसंपदा !

ग्रंथाचे मुखपृष्ठ

१. स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया

२. स्वतःतील स्वभावदोष कसे शोधावेत ?

३. स्वयंसूचनांद्वारे स्वभावदोष-निर्मूलन

४. स्वभावदोष आणि अहं यांच्या विविध पैलूंचे विश्लेषण

५. स्वभावदोष-निर्मूलनासाठी बौद्धिक आणि कृतीच्या स्तरांवरील प्रयत्न

६. स्वभावदोष घालवा आणि आनंदी व्हा !

७. गुण जोपासा आणि आदर्श व्हा !

८. स्वभावदोष-निर्मूलनासाठी आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्न

ऑनलाईन ग्रंथ खरेदी करण्यासाठी Sanatanshop.com आणि संपर्क क्रमांक 

संपर्क क्र. : ९१६७५१२१६१, ०९३२२३१५३१७

आपण संकेतस्थळावर सत्संगाला जोडण्यासाठी पुढे दिलेल्या मार्गिकेवर संपर्क करावा. 

https://events.sanatan.org/

९ आ. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याचा प्रायोगिक भाग : सनातन संस्थेकडून घेण्यात येणार्‍या सत्संगांत ‘स्वभावदोष कसे ओळखावे ? स्वभावदोषांमुळे होणार्‍या चुकांचे लिखाण कसे करावे ? स्वभावदोष निर्मूलनार्थ स्वयंसूचना देऊन ते कसे घालवावेत ?, हे शास्त्रोक्त आणि सोप्या पद्धतीने शिकवले जाते. हे सत्संग प्रत्यक्ष आणि संगणकीय प्रणालीद्वारेही (ऑनलाईनही) घेतले जातात.

या विषयासंबंधीची ग्रंथसंपदा सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केली आहे. तिचा अभ्यास करून स्वतःमधील स्वभावदोष न्यून करून सर्वांनी आपले जीवन सुखी करावे. ‘स्वभावदोष आणि अहं यांनी ग्रासलेल्या समाज बांधवांना स्वभावदोष अन् अहं निर्मूलनार्थ प्रक्रिया करण्याची बुद्धी होवो’, अशी मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करतो.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण !’

                                                                      इदं न मम ।

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, पनवेल. (१२.८.२०२३)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.