केंद्रीय प्रदूषण मंडळाच्‍या अहवालानुसार सांगलीची हवा सर्वांत चांगली !

केंद्रीय प्रदूषण मंडळ

सांगली – केंद्रीय प्रदूषण मंडळाने घोषित केलेल्‍या अहवालात  काही शहरांच्‍या प्रदूषण स्‍तरात घट होत चालल्‍याची नोंद करण्‍यात आली आहे. अहवालात सांगलीची हवा सर्वांत चांगली असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. सांगली जिल्‍ह्यातील प्रदूषण राज्‍याच्‍या तुलनेत अगदी अल्‍प असून राज्‍यातील सर्वांत चांगली आरोग्‍यदायी हवा सांगलीची असल्‍याचा उल्लेख मंडळाने केला आहे. ही सांगलीकरांच्‍या दृष्‍टीने अभिमानास्‍पद गोष्‍ट आहे. हवेचे प्रदूषण मोजण्‍यासाठी जो मापदंड वापरला जातो, त्‍यानुसार ० ते ५० या स्‍तरातील हवा सर्वांत चांगली समजली जाते. येथील पर्यावरणात ऑक्‍सिजन देणारी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. औद्योगिक संस्‍थाही प्रयत्नपूर्वक हवेत कार्बन डायऑक्‍साईड, कार्बन मोनोऑक्‍साईडसारख्‍या वायूंचे उत्‍सर्जन होणे टाळण्‍यासाठी प्रयत्न करतात.

सांगली, कोल्‍हापूर या जिल्‍ह्यांचा समावेश ‘हेल्‍दी’ शहरांमध्‍ये होतो. तेथे मानवनिर्मित अभयारण्‍ये आहेत. तेथे काही सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी प्रयत्नपूर्वक केलेल्‍या वृक्षारोपण मोहिमेमुळे या जिल्‍ह्यातील हवेची गुणवत्ता सर्वाधिक आहे.