नेरूळच्या अनधिकृत मशिदीसह सर्व गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे पाडा ! – सतीश कोचरेकर, हिंदु जनजागृती समिती पनवेल येथे पत्रकार परिषद
पनवेल – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ‘शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा’च्या (सिडको) भूमीवर बेकायदेशीररित्या उभारलेला दर्गा, तसेच अन्य अनधिकृत बांधकामे प्रशासनाने पाडली. हा लढा केवळ हिंदु जनजागृती समितीने दिला, असे नाही, तर यात हिंदुत्वनिष्ठ संघटना, सामान्य हिंदूही सहभागी झाले होते. हे हिंदूंच्या संघटितपणाचे यश आहे. शासनाने गंभीर नोंद घेऊन निष्कासनाची कारवाई केली, त्याविषयी समितीच्या वतीने शासनाचे अभिनंदन करतो. नेरूळ येथे असलेली अवैध मशीद तोडण्यात यावी, तसेच शिवडी-लोहगडसह सर्व गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे पाडावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी केली. ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रसंगी समितीचे श्री. राजेंद्र पावसकरही उपस्थित होते.
श्री. सतीश कोचरेकर म्हणाले की,…
१. या प्रकारामुळे ‘वक्फ बोर्डा’चे षड्यंत्र उघडकीस आले असून प्रारंभी कोणत्याही भूमीवर दावा सांगून नंतर ती भूमी कशी बळकावली जाते, हे लक्षात येते. याविरोधात हिंदूंनी जागृत होणे आवश्यक आहे. समितीच्या वतीने केंद्र सरकारकडेही तक्रार करण्यात आलेली आहे.
२. ज्याप्रकारे सिडकोच्या भूमीवर बेकायदेशीर दर्गा उभा राहिला, त्याचप्रकारे नवी मुंबईतही अनेक ठिकाणी बेकायदेशीर प्रार्थनास्थळे झाली आहेत. त्यांवरही कारवाई होणे अपेक्षित आहे.
३. विशाळगड, कुलाबा, लोहगड, वंदनगड, शिवडी गडांवर अतिक्रमणे झाल्याचे लक्षात आले आहे. हिंदु जनजागृती समितीने ही मागणी सातत्याने लावून धरल्यामुळे माहीम गडावरील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले; मात्र आज राज्यातील ३५ महत्त्वाच्या गड-दुर्गांवरील अशी अनधिकृत बांधकामे झाल्याचे स्वत: राज्य पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे.
४. प्रतापगड, माहीम किल्ला आणि नवी मुंबई येथील अनधिकृत बांधकामे ज्या पद्धतीने हटवण्यात आली, त्याचप्रमाणे राज्यातील ३५ महत्त्वाच्या गड-दुर्गांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी शासनाने पावले उचलावीत आणि पावित्र्य अन् संस्कृती आबाधित राखावी, अशी मागणी समितीच्या वतीने आम्ही करत आहोत.
‘नेरूळ टी.एस्. चाणक्य मेरीटाईम बोर्डाच्या मागील भूमीमध्ये अनधिकृत दर्गा उभारण्यात आला आहे. ही भूमी संपादित करतांना वर्ष १९७३ पूर्वी सिडकोने येथे काहीही नसल्याचा अहवालात उल्लेख केला होता; मात्र आता येथे साडेपाच हेक्टर भूमी वक्फ बोर्डात नोंद करण्याचा घाट घातला आहे. या संदर्भात सिडको, तसेच स्थानिक ग्रामस्थ यांनी विरोध दर्शवला असून अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. सिडकोने बी.ए.आर्.सी. प्रकल्पाला धोका असलेल्या या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करावी’, अशी मागणी श्री. सतीश कोचरेकर यांनी केली. |