कळकळ (तळमळ) असेल, तर भगवंताशी बोलता येते !
अधिकोषाच्या एका अधिकार्याने मुंबईच्या अधिकोषातून सोलापूरच्या अधिकोषात दूरभाष (टेलिफोन) केला. सोलापूरच्या अधिकोषातील अधिकार्याने श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना) नमस्कार सांगितला. तो पोचवला असता श्रीमहाराज म्हणाले, ‘मुंबईहून सोलापूरचे अंतर किती आहे ?’ अधिकारी बोलले, ‘किमान २७० मैल (अनुमाने ४३२ किलोमीटर) आहे.’ श्रीमहाराजांनी विचारले, ‘एवढ्या लांबवर तुम्हाला एकमेकांशी कसे बोलता आले ?’ अधिकारी गृहस्थांनी दूरभाषची माहिती सांगितली. त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘हे जर खरे, तर संत किंवा भक्त देवाशी बोलू शकतात, असे आम्ही म्हटले, तर ते अशक्य किंवा खोटे का वाटावे ? मुंबईहून सोलापूरशी तुम्ही जे बोलता, तेथे एक ध्वनीवाहक तार असते; पण एका नळीतून बोलावे लागते. तसे भगवंताशी बोलतांना ‘कळकळीची नळी’ जर उत्पन्न केली, तर भगवंताशी सहज रितीने बोलता येते, हे लक्षात ठेवावे. कळकळीची नळी उत्पन्न करण्यासाठी भगवंताचे प्रेम उत्पन्न व्हावे लागते. यासाठी मनापासून नामस्मरण करणे, हाच एक उपाय आहे.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक – ल.ग. मराठे)